हम पैरोतले जमीन,दिलमे मोहब्बते और मुठ्ठीमे आसमान रखते है!
पातूर – महाराष्ट्रात पुसद हा एकमेव असा विधानसभा मतदार संघ आहे की, जेथे १९५२ पासून एकाच नाईक घराण्याची सत्ता जनतेने अबाधित ठेवली आहे. ७२ वर्षे येथील जनतेने नाईक परिवारावर अलोट प्रेम केले आहे. वसंतराव नाईक साहेब, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांचे पासून तर आता याच कर्तबगार घराण्याचे चौथे शिलेदार इंद्रनील नाईक या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सुसंस्कृत राजकारण कसे करावे याचा आदर्श हे त्याचे प्रबळ कारण आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचे अमीट ठसे उमटविलेला हा परिवार देशातील मोजक्या परिवारांपैकी एक आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. या महाराष्ट्रात पाण्याचे महत्व ओळखुन वसंतराव नाईक साहेबांनी अनेक धरणे बांधली, विजप्रकल्प निर्माण केले.या राज्यातील धरणे एकतर कांही ब्रिटिशांनी आणि बाकीची पुर्ण नाईक साहेबांनी केलेली आहेत.शेती हा जीवकीप्राण असलेले नाईक साहेब म्हणूनच हरितक्रांतीचे प्रणेते ओळखले जातात. रोजगार हमी योजना, कापुस एकाधिकार योजना, बियाणे महामंडळ व चार कृषी विद्यापीठे ही त्यांची ठळक कामगिरी अभूतपूर्व आहे. सुधाकरराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात प्रथमच महाराष्ट्रात स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण केले त्यामुळे ते जलक्रांतीचे जनक ठरले आहेत. आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रात आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा नाईक परिवार म्हणूनच राज्याला आपला वाटत आला आहे. सदैव लोकांच्या अडीअडचणीत मदत करणारे मनोहरराव नाईक यांचे दातृत्वाचे अनेक प्रसंग आहेत. संकटात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे लोक आशेने पाहतात. सर्वच घटना याठिकाणी या लेखात नमुद करणे शक्य नाही. त्यांचे हळवे मन, साधेपणा यावर एक मोठा प्रबंध होवु शकेल एवढी प्रचंड कामगिरी त्यांच्या खात्यात जमा आहे पण त्याचा साधा उल्लेख सुद्धा ते करत नाहीत.कोणी मान्य करो वा न करो प्रसिद्धी साठी त्याचा उपयोग ते कधीही करतांना दिसत नाहीत, हेच त्यांचे सर्वात मोठे बलस्थान असल्याचे जाणवते आहे.आकाशाला गवसणी घालणाऱ्या या परिवाराने मातीशी नाळ कधी तुटू दिली नाही.२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या,पुन्हा पुसदचा गड इंद्रनील यांनी ९१०००चे वर मताधिक्य घेवून सर केला.या यशात मोहिनी नाईक इंद्रनील नाईक यांच्या सुविद्य पत्नी यांचा ५००००चा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. मोहिनी नाईक यांनी मताधिक्य वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली.पुसद नगरी मध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले, अनेकांच्या घराची पडझड झाली,घरात पाणी शिरले, व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरुन मोठी हानी झाली. वरुन पाऊस कोसळत असतांना सुद्धा त्या घराबाहेर पडल्या, ओल्याचिंब होवुन कमरे एवढ्या पाण्यात चालत राहून लोकांना मदत करत राहिल्या हे पुसदनेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. कोठून येते ही ऊर्जा?जनतेप्रति असलेल्या कृतज्ञ भावनेतून ही शक्ती जन्म घेते असे मला तरी वाटते!
इंद्रनील मनोहरराव नाईक!महाराष्ट्राच्या कर्तबगार नाईक घराण्याचे चौथे शिलेदार यांनी नागपूर येथे उद्योग, पर्यटन, उच्च व तंत्रशिक्षण,सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व मृद व जलसंधारण या सहा खात्याची राज्यमंत्री म्हणून राज्यपाल यांचेकडून शपथ घेतली तेंव्हा माझ्या सारख्या महाराष्ट्र, गुजरात व हरियाणा राज्यातील नातेवाईक यांच्या माना स्वाभिमानाने ताठ झाल्या व डोळ्यात आनंदाश्रूही तरळले. नामदार अजितदादा पवार यांनी इतिहासाची पुनरावृत्ती ताजी केली.याच नागपूर भूमीवर पंडित रविशंकर शुक्ला यांचे मंत्रिमंडळात महानायक वसंतराव नाईक साहेब यांनी बहात्तर वर्षांपूर्वी मंत्री पदाची शपथ घेतली होती.मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी अजितदादा पवार यांना राज्यमंत्री पदाची राजवस्त्रे बहाल केली होती. लोक म्हणतात काळ वेळेत काय आहे?मी म्हणतो काळाची पदरे उलगडत गेलो तर त्यात असंख्य घटनांचा इतिहास दडलेला असतो फक्त आपल्याला कृतज्ञ होता आले पाहिजे!इंद्रनील नाईक हा सहृदयी तरुण नेता नाईक साहेबांच्या मार्गावर चालत जावून पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देईल अशी प्रांजळ भाबडी आशा घेवून महाराष्ट्रातील बंजारा, शेतकरी शेतमजूर, दिनदुबळे आस घेवून बसले आहेत, त्यात वावगे तरी काय आहे?कारण इंद्रनील नाईक यांच्या मध्ये यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांचा चेहरा महाराष्ट्रातील जनता शोधत आहे.आपल्या भाग्य पटलावर हा नाईक परिवाराचा चौथा शिलेदार व आपला तारणहार नव्या तेजाने तळपणार याची खात्री वाटायला लागली आहे. पुसद येथील लोकार्पणापासून उपेक्षित असलेले वसंत स्मारक व उद्यान परिसराचा कृषी प्रिती संगम म्हणून प्रथम प्राधान्यक्रमाने विकास व्हावा ही बंजारा समाज व समस्त शेतकरी वर्गाचा अस्मितेचा व भावनांशी निगडित विषय असल्याने तमाम महाराष्ट्र वासीयांच्या आशा आपल्या मंत्री पदाने पल्लवित झाल्या आहेत.
प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला
9923482062