दिग्रस येथे ईद-ए-मिलादनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
डॉ. एपीजे कलाम फोरमचा पुढाकार
दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांची जयंती अर्थातच ईद-ए-मिलादच्या पावन पर्वावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरमच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सरकारी दवाखान्यात करण्यात आले आहे. या शिबिरात समाजातील सर्व जाती धर्माच्या युवक, महिला व पुरुषांनी रक्तदान करण्याच्या आवाहन आयोजकांनी केले आहे.
आज विज्ञानाने प्रगती व यशाची ऐवढी क्षितिजे गाठली असली तरी रक्तासाठी एका माणसाला दुसऱ्या माणसावर अवलंबून राहावे लागते. माणूसच माणसाची रक्ताची गरज भागवू शकतो. त्यामुळेच रक्तदान शिबिरे आयोजित करून मानवी रक्त गोळा केल्या जाते. गोळा केलेले रक्त आवश्यक ती प्रक्रिया करून गरजेप्रमाणे वापरले जाते. यवतमाळ येथील शासकीय रक्त पेढीला दररोज किमान 40 रक्त पिशव्यांची गरज भासते.
त्यामुळे पुढे रक्ताची टंचाई जाणू नये म्हणून रक्त संकलन आवश्यक असते. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी, अपघातात जखमी झालेल्यांसाठी, प्रसुतीला आलेल्या महिलांसाठी आणि थलेसिमिया, सिकलसेलग्रस्त बालकांना रक्ताची चणचण जाणवू नये यासाठी रक्तदान आवश्यक असून समाजातील सर्व नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरमचे मुख्य कार्यवाह मिर्झा अफजल बेग , अध्यक्ष फिरोज खान , प्रकल्प प्रमुख आमीन नौरांगाबादे , आतीक शेख , कार्याध्यक्ष मिर्जा नासीर बेग , उपाध्यक्ष अजीम खान , फारुक अहेमद , आसिफ पठाण , आसिफ शेख यांनी केले आहे. रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे हे डॉ. कलाम फोरमचे चौथे वर्ष आहे. वर्षभर गरजूंना रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे कार्यही डॉ कलाम फोरम करीत असते.
दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 11 ते 3 या वेळात आयोजित रक्तदान शिबिरात दिग्रसकरांनी मोठ्या संख्येत रक्तदान करून या पवित्र, जीवनदायी महान कार्यात सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. कलाम फोरमचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत .
शिबिराच्या आयोजनात गुरुकुल इंग्लिश स्कूलचे शरीफ शेख , प्रियंका मेमोरियलचे सदानंद आठवले , विमा सल्लागार अभय नानोटे , लक्षवेध क्रीडा अकॅडमीचे सुरेंद्र राठोड , गोदावरी बँकेचे राहुल कोल्हे पाटील , शेतकरी मित्र संतोष चव्हाण , मो. फरहान , समीर खान , तौसीफ खान , विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी , टॅक्सी चालक मालक संघटना , केमिस्ट संघटना , शिक्षक संघटना , विविध समाज संघटना आणि दिग्रसकर नागरिक हातभार लावत आहेत.