पंतप्रधान नंगारा सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पोहरादेवी ला येणार
येत्या सव्वीस तारखेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
मानोरा –(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) तालुक्यातील इतिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे महाराष्ट्र शासनाकडून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य नंगारा वास्तूचे लोकार्पण या महिन्यात आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने देशभरातील बंजारा व संत सेवालाल महाराज यांना मानणाऱ्या भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी नियोजनासाठी आयोजित बैठकीदरम्यान केले.
पुरोगामी विचाराचे महान संत सेवालाल महाराज यांची समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या ऐतिहासिक व समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब नंगारा या वास्तुद्वारे उलगडण्यात येणार आहे.
युती शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री व महायुती सरकारमधील विद्यमान उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रलंबित तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकास आराखड्याची पायाभरणी करण्यात येऊन यासाठी शेकडो कोटी रुपयाची तरतूद करून नंगारा वास्तू आणि संत सेवालाल महाराज मंदिराचे पुनर्निर्मान, तीर्थक्षेत्र उमरी गड विकास करण्यात येत आहे. यातील नंगारा या भव्य दिव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा येत्या २६ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यातील गणमान्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
नंगारा या ऐतिहासिक वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी वाशिम यवतमाळ आणि राज्य व देशातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होण्यासाठी यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील समाज बांधवांसाठी नियोजन बैठक पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत यवतमाळला करण्यात आले असता पोहरादेवी येथील लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन ना.राठोड यांनी उपस्थितांना केले.