महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटी कामगारांची कंत्रादाराकडून पिळवणूक?
किमान वेतन कायद्यानुसार वेतनाची मागणी
मानोरा :- तालुक्यातील 28 गावांना पाणीपुरवठा करणारी वाईगौळ येथिल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत येत असून त्याकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्याकरिता नेमून दिलेल्या कंत्राटी कंपनीने नियुक्त केलेल्या कामगारांना अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचे वेतन प्रदान करीत असल्याने कामगार आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
कंत्राटदार याने महाराष्ट्र शासनाचे किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन प्रदान करणे आवश्यक आणि बंधनकारक असूनदेखील कंत्राटदार कामगारांना चार ते सहा हजार रुपये वेतन देत आहे. नियमांनुसार प्रत्येक कामागरास पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन प्रदान करणे आवश्यक आहे. यासाठी आता सर्व पंचवीस कामगारांनी कार्यकारी अभियंता, मजिप्रा, वाशीम आणि सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदन प्राप्त होताच कार्यकारी अभियंता राठोड यांनी उपविभागीय अभियंता मुंडे आणि शाखा अभियंता घुगे यांना वाईगौळ येथिल प्रकल्प कार्यालयात कामगारांसोबत चर्चा करण्याकरीता पाठविले होते. उक्त अधिकारी आणि कामगार यांच्या झालेल्या चर्चेत उपविभागीय अभियंता यांनी कामागारास आश्र्वस्त केलें की, विभागाद्वारे सबंधित कंत्राटदारास विभागाकडून पत्राद्वारे याविषयी विचारणा करण्यात येईल आणि किमान वेतन कायद्याचे पालन करण्याबाबतही कंत्राटदारास सूचना देण्यात येईल.