पत्रकार संदीप रत्नपारखी यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी
दिग्रस शहरातील सेवानगरी येथील घटना
दिग्रस ,(दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
स्थानिक दिग्रस शहरातील बस स्थानकासमोरील परिसर सेवानगरी येथे पत्रकार संदीप रत्नपारखी यांच्या घरी दिवसाढवळ्या दि. 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान चोरी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घर फोडून व घरातील कपाटाचे लॉकर तोडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 5 हजार रुपये लंपास केले. त्यामुळे दिवसाढवळ्या चोरी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पत्रकार संदीप रत्नपारखी हे श्रीराम अर्बन बँकेमध्ये कार्यरत आहे. ते सकाळी 10:00 च्या सुमारास दररोज बँकेत गेले होते व त्यांच्या पत्नीचे टेलर दुकान आहे. त्या सुद्धा दुकानांमध्ये 11.30 वाजता दररोज गेल्या होत्या. आणि मुलं शाळेत असल्याने दुपारी घर बंद होते. या संधीचा फायदा घेऊन व सतत पाळत ठेवून दि. 5 ऑगस्ट रोजी दुपारी 11.30 ते 5.30 वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाज्याचा कोंडा धारदार शस्त्राने व हातोड्याने तोडून नंतर आत मध्ये कपाट फोडून कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे दागिने ज्यामध्ये प्राप्त बिलानुसर 13.45 ग्रॅमची सोन्याची पट्टापोत किंमत 63 हजार 215 रुपये, 9 ग्रॅमच्या सोने दोन अंगठ्या किंमत 49 हजार 914 रुपये, 5 ग्रॅम कानातले सोने लटकन किंमत 29 हजार 870 रुपये एकूण 1 लाख 42 हजार 999 रुपयांचे सोने व रोख 5 हजार रुपये घेऊन त्या ठिकाणाहून घर तसेच मोकळे सोडून पोबारा झाले.
पत्रकार संदीप रत्नपारखी हे सायंकाळी 5.30 वाजता बँकेतून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला व आतमध्ये पाहणी केली असता, कपाट हे तोडलेले व लॉकर सुद्धा आत मधून तुटलेले आढळले. तसेच आजूबाजूला कपाटातील सर्व साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले. व कपाटामधून सोने व रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच ठाणेदार वानखडे यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदार वानखडे यांनी सुद्धा त्वरित सहकार्य करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्यासोबत पाठवून पंचनामा केला. अज्ञात चोरट्यान विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल मदने, सुजित जाधव व केशव चव्हाण हे फिर्यादी सोबत स्वतः आजूबाजूच्या अनेक घराचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पहात असून शोध मोहीम सुरू आहे. स्थानिक परिसरातील नागरिक सुद्धा संदीप रत्नपारखी यांना सहकार्य करीत आहे.
कोठारी लेआउट मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलेल्या चित्रफिती वरून दिग्रस पोलीस या अट्टल चोरट्यांचा छडा लावत आहे. ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस पुढील तपास करीत आहेत. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून परिसरातील महिला धास्तावल्या आहेत. त्यामुळे दिग्रस पोलिसांनी दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांचा लवकर शोध घेऊन नागरिकांच्या मनातील ही धास्ती दूर करावी, अशी मागणी होत आहे.