आगळावेगळा छंद जोपासणारे असलम खान काळाच्या पडद्याआड
दिग्रस :-
दिग्रस तालुक्यातील कांदळी येथील निवृत्त मुख्याध्यापक असलम खान गफ्फार खान यांचे आज {ता. १८} सकाळी सकाळी ११ वाजता दुर्धर आजाराने निधन झाले . मृत्यू समयी ते ७५ वर्षाचे होते . जगातील विविध क्षेत्रातील लोकांचे आवाज टेप करण्याच्या आगळ्यावेगळ्या छंदामुळे ते सर्वदूर ओळखले जात होते .
असलम खान यांच्या जीवनाचा अधिकतर काळ जिल्हा परिषद शिक्षक म्हणून ग्रामीण भागातच गेला . छंद म्हणून किंवा फावल्या वेळात त्यांनी रेडिओवर येणारे कार्यक्रम टेप करण्यास सुरुवात केली . काही वर्षाच्या आतच त्यांच्याकडे जगातील दुर्मिळ व्यक्तींच्या दुर्मिळ आवाजांचा भलं मोठं खजीना जमा होईल हे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हते .
त्यांच्याकडील २० हजार ऑडिओ कॅसेटमध्ये जगातील महान व्यक्तीपासून खेड्यातील कास्तकारपर्यंतच्या तब्बल १ लाख दुर्मिळ आवाजांचा संग्रह आहे . यात राष्ट्रपिता महात्मा गांधी , पंडीत जवाहरलाल नेहरू , डॉ बाबासाहेब आंबेडकर , मौलाना अबुल कलाम आझाद , मदर टेरेस , अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी , राणी एलिझाबेथ , डॉ नेल्सन मंडेला , अटल बिहारी वाजपेयी , संगीत सम्राट नौशाद अली , इंदिरा गांधी , राजीव गांधी , यासर अरफात , कवी दिनकरसह जगातील राजकारण , क्रीडा , कला , साहित्य , संगीत , गायन-वादन , चित्रकला , विज्ञान , तंत्रज्ञान , इतिहास , भूगोल , संशोधन , शिक्षण , उद्योग-व्यापार , धर्म , चित्रपट , गुन्हेगारी , शेती , जगातील विविध देशात आलेले भूकंप , महापूर , सुनामी , मराठी साहित्य संमेलने , राजकीय उलथापालथसह इतर घटना , दुर्घटना व सर्वच क्षेत्रातील लोकांचे दुर्मिळ आवाज टेप आहे .
बीबीसी लंडन , व्हॉइस ऑफ अमेरिका , विविध भारती , अस्मिता वाहिनी , आकाशवाणी , रेडिओ सिलोन आदींवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांना ते दररोज टेप करून ठेवत असत . काही दिवसांपूर्वी त्यांनी सर्व कॅसेटवर नंबर , विषय व तारीख टाकून रजिस्टरवर देखील त्याचा उतारा केला होता . एड्स , शिक्षण , स्वच्छता अभियान , हागणदारीमुक्त गाव अभियान , महात्मा गांधी तंटामुक्त अभियानसाठी व इतर उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना शासनातर्फे व इतर संघटनांतर्फे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते .
काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते सलीम खान यांचे ते ज्येष्ठ बंधू होते . असलम खान यांच्या मागे पत्नी , पाच विवाहित मुली , दोन मुलं , नातवंडे असा मोठा परिवार आहे . सायंकाळी सात वाजता कांदळी या मूळ गावी त्यांना “सुपूर्द-ए-खाक” करण्यात येणार आहे .
फोटो :— असलम खान