श्रीदुर्गामाता मंडळाकडून “प्रभू श्रीरामचंद्रांच्या” महाआरतीचे आयोजन
◆महाप्रसादाचे वाटप करणार ; युवकांकडून जय्यत तयारी
दिग्रस :
श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून या सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील श्रीदुर्गामाता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रभु श्रीरामचंद्राच्या महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
शहरातील श्रीदुर्गामाता चौक येथील श्रीदुर्गामाता मंडळाचे युवक नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. दरवर्षी हे युवक श्रीरामनवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी भाविकांकरिता थंड पेय अथवा नाश्ताची व्यवस्था करतात. गेल्या वर्षी श्रीरामजन्मभूमीत श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेचा दिवस ठरल्यानंतर मोठ्या जल्लोषात श्रीराम नवमी उत्सव साजरा केला. २१ फूट उंच श्रीरामाची प्रतिमा व आकर्षक असा लाईट शो हे त्यावेळी विशेष आकर्षण ठरले होते. महाआरतीचे आयोजन त्यावेळी करण्यात आले होते. सोमवारी दि.२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याने महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्रीदुर्गामाता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. यामध्ये सोमवारी दि.२२जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता पासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ठीक ७.३० वाजता भजनी मंडळाच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्राची महाआरती केली जाईल.
— चौकट —
“म्युझिकल ड्रामा शो” विशेष आकर्षण —
श्रीदुर्गामाता मंडळाचे बालक देखील या महाउत्सवात सहभागी होणार असून सायंकाळी ७.३० च्या महाआरतीनंतर हे बाल कलाकार श्रीरामाच्या जीवनावर आधारित “म्युझिकल ड्रामा शो” सादर करतील. या विशेष आकर्षणासह महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीदुर्गामाता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.