दिग्रस मध्ये “हर घर सीताराम”
◆शहर विद्युत रोषणाईने उत्सवासाठी सज्ज
दिग्रस :
भारतीयांच्या अस्मितेचा विषय असलेल्या श्रीरामजन्मभूमीचा तिढा सुटला आणि त्याठिकाणी श्रीरामचंद्राचं भव्य असं श्रीराम मंदिर उभं झालं. याच श्रीराम मंदिरात सोमवारी (ता.२२ जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याप्रसंगी संपूर्ण देशामध्ये दिवाळीप्रमाणे सण साजरा केला जातोय. यानिमित्ताने दिग्रसमध्ये प्रत्येक घर श्रीरामनामाने प्रवित्र होत आहे. श्रीराम जन्मभूमी येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी संपूर्ण दिग्रस मध्ये सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिग्रसच्या ब्राम्हणपुरी येथील श्रीराम मंदिरातुन घरोघरी अयोध्या येथून आलेल्या अक्षदकलश मधील अक्षद वाटप करण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण दिग्रस शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. श्रीरामजन्मभूमी येथील मंदिरात सोमवारी (ता.२२ जानेवारी) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याने दिग्रससह संपूर्ण जिल्हा व राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने दिग्रसच्या श्रीराम मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून या रोषणाईने दिग्रस मधील रस्ते उजळून निघाल्याने जणू दिवाळीच असल्याचा भास होत आहे. शहरातील खांबांवर लावण्यात आलेले श्रीरामाचे फोटो व भगवे झेंडे यामुळे संपूर्ण दिग्रस शहर राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या श्रीराम मंदिरासह विविध ठिकाणी श्रीरामप्रभू यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्रीदुर्गामाता चौक येथील श्रीदुर्गामाता मंडळाच्या वतीने सोमवारी (ता.२२ जानेवारी) सकाळी १२ वाजता पासून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. यासोबतच सायंकाळी ७ वाजता भजनी मंडळासह प्रभु श्रीरामचंद्राची महाआरती केली जाईल व त्यानंतर श्रीदुर्गामाता मंडळाचे बाल कलाकार म्युझिकल ड्रामा सादर करणार असून, महाप्रसादासह इतर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीदुर्गामाता मंडळाने केले आहे.
मंदिर परिसरातील घरांवर येथील तरुण युवकांनी “जय श्रीराम, शहर मे सीता राम” असे वाक्य लिहिलेले चित्र देखील रेखाटल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीत संपूर्ण दिग्रस “राममय” झाल्याचं चित्र आहे.
— चौकट —
श्रीराम मंदिरात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम —
अयोध्यामधील भव्य श्रीराम मंदीरात प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणुन दिग्रस येथील श्रीराम मंदीरा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी (ता.२० जानेवारी) सकाळी ६.३० वाजता प्रभुश्रीरामाचा दुग्धाभिषेक करण्यात आला व साय. ७ वा. आरतीनंतर तुलसीदास रामायण मंडळ द्वारे हनुमान चालीसा व महीला मंडळा व्दारे राम रक्षा पठण करण्यात आले. रविवारी (ता.२१ जानेवारी) साय. ७ वा. भजनी मंडळाच्या उपस्थितीत भजन व आरती, त्यानंतर रामरक्षा पठण व रामनाम जप होईल आणि सोमवारी (ता.२२ जानेवारी) ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सर्वतोभद्र राम मंडळ पुजा तसेच लिंगातोभद्र व मातृका पूजन करून नवग्रह पुजन, सर्व देवी-देवतांना आवाहन कलश, होमहवन आणि आरती केली जाईल. त्यानंतर सायंकाळी गुरुदेव भजनी मंडळ व रामायण मंडळाद्वारे महाआरती व महिला मंडळ द्वारे रामरक्षा पठण करून महाप्रसाद वाटप होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.