दापूरा येथील विद्यार्थ्यांना यावर्षी शिक्षक मिळण्याच्या आशा धुसर
तात्पुरता रुजू होण्याच्या प्रशासकीय आदेशाला शिक्षकाकडून केराची टोपली
मानोरा:– तालुक्यातील शिक्षण, सिंचन,आरोग्य आणि इतरही महत्त्वपूर्ण शासकीय विभागातील बेबंदशाही चा फटका स्थानिक नागरिकांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे बसत असून प्राथमिक शाळेमध्ये ज्ञानार्जन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी महीनोंमहिने शिक्षक नसल्याने या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासमोर भले मोठे प्रश्नार्थक चिन्ह आ वासून उभे ठाकले आहे.
दापुरा येथील शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नेमणुकीला असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांमधून दोन महिला शिक्षिका आजारी रजेवर असून एक शिक्षक प्रशिक्षणासाठी असल्याने मंजूर पदांपैकी तीन शिक्षक उपरोक्त कारणांनी मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत ज्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पडत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी बाळू राठोड हे शाळा सुरू झाल्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून त्यांच्या पाठपुराव्याची दखल पं.स.च्या शिक्षण विभागाने घेऊन गणेश गवळी ह्या प्राथमिक शिक्षकांना तात्पुरते दापुरा येथे रुजू होण्याचे बदली आदेश या महिन्याच्या २१ तारखेला काढून २३ तारखेला रुजू होण्याचे लेखी कळविले होते.
रुजू होण्याच्या तात्पुरत्या बदली आदेशाला आठवडा उलटूनही प्राथमिक शिक्षक दापुरा येथे रुजू न झाल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेशा संख्येत यावर्षी शिक्षक मिळतात की नाही असे गंभीर व न सुटणारे कोडे ग्रामस्थांना पडलेले आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक न मिळाल्यास ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिल्याची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला कळविले आहे .