स्व. गोवर्धन शर्मा हे ख-या अर्थाने जनसामान्यांचे नेते
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला, दि. 4 : आमदार स्व. गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये सहज मिसळून त्यांचे सुखदु:ख जाणून घेणारे, अडचणीला तत्काळ धावून जाणारे, तसेच राजकारणात विरळा व नि:स्पृह व्यक्तिमत्व होते. ते ख-या अर्थाने जनसामान्यांचे नेते होते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज अकोला येथील आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्री. फडणवीस यांनी स्व. शर्मा यांचे कुटुंबिय श्रीमती गंगादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, अनुप शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, स्व. शर्मा यांनी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द अनुभवली. आपण स्वत: त्यांच्यासोबत 25 वर्षे विधानसभेत काम केले. ते संघर्षशील व जिंदादिल नेतृत्व होते. लोकांमध्ये सहज मिसळून जाण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी जनसामान्यांत मिसळून त्यांच्या अडचणी सोडविल्या. त्यांना सत्तेचा लोभ नव्हता. मिळालेले मंत्रीपद त्यांनी सोडून दिले. लालाजींशिवाय अकोल्याची कल्पनाही करता येत नाही.
यावेळी स्व. शर्मा यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. आमदार रणधीर सावरकर, सुधाकर भारसाकळे, हरिश पिंपळे, आकाश फुंडकर, राजेंद्र पाटणी, वसंत खंडेलवाल, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक संदीप घुगे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
000