नवरात्री विशेष…
पोरियागडाची आदिशक्ती (मरियामा) देवी जगदंबा
प्रा.डॉ.सुभाष राठोड/जगदीश जाधव
मानोरा —
“थाळी नगाराच्या निनादाने दुमदुमते अवघी पोहरानगरी !
महाभोग,महाआरती, आरदासाच्या पवित्र सुराने गजबजते बंजारा काशी !”
संपूर्ण भारतातील गोर-बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले ‘तीर्थक्षेत्र पोहरादेवी’ हे ‘गोर-बंजारा समाजाची काशी’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे तीर्थक्षेत्र भारतीय गोर-बंजारा समाजात अजरामर झालेले असून दरवर्षी रामनवमी, नवरात्रात मिळून येथे वर्षाकाठी चार वेळा भव्य यात्रा भरते. जगदंबा देवीचे येथे भव्य मंदिर असून जगाला परिवर्तनाची दिशा देणारे संत सेवालाल महाराज यांची पोहरादेवी येथे समाधी आहे. जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज, सामकी माता, संत रामराव महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या तीर्थस्थळी देशभरातून भाविक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राबरोबरच भारतातील इतर राज्यातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी नित्यनेमाने येत असतात. यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर जाती – धर्मातील भाविक सुद्धा दरवर्षी मोठ्या संख्येने पोहरादेवी येथील जगदंबेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.
तिर्थक्षेत्र पोहरादेवीचा इतिहास २५० वर्षांहूनही अधिक जुना आहे. पूर्वीच्या अकोला व सध्याच्या वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील पोहरादेवी हे तीनशे – चारशे वस्तीचे निसर्गराजीने नटलेले पूर्वीचे छोटेसे गाव. जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज, सामकी माता यांच्यावरील श्रद्धेपोटी हळूहळू या तीर्थस्थानाचे महत्त्व वाढत गेले. पूर्वेस दगडी परकोटाचे महाद्वार, पश्चिमेस एक चिंचेचे झाड व विहीर, उत्तरेस परकोटाची लांब दगडी भिंत व दक्षिणेस जगदंबा देवीचे भव्य मंदिर असा या देवस्थानचा पूर्वीचा परिसर होता . या धार्मिक स्थळाला लागूनच ‘उमरी येथे सामकी मातेचे भव्य मंदिर आहे. १८ व्या शतकात पोहरादेवी हे संत सेवालाल महाराज यांचे माहेरघर बनले. अगदी पूर्वीच्या काळापासून आसपासच्या परिसरातील भाविक भक्त लोक बैलगाडी, छकड्याच्या साहाय्याने व दूरदूरच्या परिसरातून पायीसुद्धा येत असत. या गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे ५५० हेक्टर असून सन २००१ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ४७२६ इतकी आहे.
तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्यामुळे येथे भव्यदिव्य असे ‘नगारा भवन’ देखील उभारले जात आहे. पोहरादेवी येथे नुकताच १२ फेब्रुवारी ०२३ रोजी सेवाध्वज कार्यक्रमानिमित्त सेवालाल महाराज ११ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार शेकडो कोटी रुपये विकासावर खर्च केले जात आहेत.
दरवर्षी नवरात्रोत्सवात भोग (भंडारा) आरदास, पालखी सोहळा विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. थाळी नंगाराच्या साथीने भजनाने अवघी पोहरानगरी या नऊ दिवसात दुमदुमून जाते. संत रामराव बापूंच्या निर्वाणानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या बाबूसिंग महाराज हे सध्या पिठाधिश्वर म्हणून वारसा पुढे चालवत आहेत तद्वतच देवीभक्त शेखर महाराज हे सुद्धा पुजारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
जगदंबा देवी आणि सेवा भाया मंदिराशी संबंधित असल्याने या देवीची राज्यभरातून आणि राज्याबाहेरून लाखो लोक मनोभावे पूजा करतात. पोहरादेवी येथे गेल्या दशकात पर्यटन विकास, लोकसंख्या, सांस्कृतिक – आध्यात्मिक संरचना, व्यवसाय संरचना इत्यादींमध्ये लक्षणीय बदल झालेले पहावयास मिळत आहेत.