पी.एम.विश्वकर्मा योजनेतून बलुतेदारांची कौशल्ये विकसित करा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
जिल्हा अंमलबजावणी समिती सभा
वाशिम हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर व हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना आधार देऊन या बलुतेदारांची कौशल्ये पी.एम.विश्वकर्मा योजनेतून विकसित करण्यात यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह नुकताच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजनेचा आढावा जिल्हा अंमलबजावणी समितीच्या सभेत घेताना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.सभेला परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, एमएसएमईचे सहाय्यक संचालक श्री.डोईफोडे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विनोद मोहपात्रा, सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र पडघान,जिल्हा उद्योग केंद्राचे पर्यवेक्षक डी.के.लोखंडे व कौशल्य विकास विभागाचे श्री.बोळसे यांची उपस्थिती होती.
श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 1 लक्ष लाभार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात येत आहे.ग्रामपंचायत आणि नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 18 प्रकारच्या कारागिरांची नोंदणी सीएससी केंद्राच्या माध्यमातून करण्यात यावी.सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी ही मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे.लाभार्थ्यांकडून सीएससी केंद्राने कोणतेही शुल्क नोंदणीसाठी आकारू नये.गावपातळीवर ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ऑपरेटरच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. गावातील कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी संबंधित ग्रामपंचायत सरपंचांची राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
पी.एम.विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता आधारकार्ड, मोबाईल क्रमांक व शिधापत्रिका ही कागदपत्रे लागणार असल्याचे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,पती-पत्नी व दोन अविवाहित मुलेमुली या नोंदणीसाठी पात्र राहणार आहे. ग्रामपंचायत हे निश्चित करणार आहे की,कोणती व्यक्ती या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळण्यास पात्र आहे.संबंधित पोर्टलवर या योजनेसाठी नोंदणी करावी.ही योजना अत्यंत चांगली असून अनेकांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 1 लाख लाभार्थ्यांची नोंदणी करून या योजनेचा लाभ देण्यात यावा. ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी व्हावी यासाठी दवंडीच्या माध्यमातून लोकांना योजनेची माहिती द्यावी. नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात कचरागाडीच्या माध्यमातून या योजनेविषयी जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
बचतगटाच्या महिला मोठ्या प्रमाणात शिवणकाम करीत असल्याचे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,त्यांना शिवणकाम व्यवसायात सक्षम करण्यासाठी पी.एम.विश्वकर्मा योजनेचा लाभ देण्यात यावा.एनएसएस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी.जिल्ह्यात मोठे उद्योग व्यवसाय नाही.त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यक्तींची कौशल्ये विकसित करावी.असे त्या म्हणाल्या.
जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत 265 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. 2157 सीएससी सेंटर जिल्ह्यात कार्यरत आहे.जिल्ह्यात 16 हजार 576 बलुतेदार सभासद असून 5299 सभासदांना मंडळाच्या योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती पर्यवेक्षक श्री.डी.के.लोखंडे यांनी यावेळी दिली.