दिग्रसच्या सुर्यकोटी गणेश मंडळाकडून भव्य डोळे तपासणी शिबिराचे आयोजन
दिग्रस :
सुर्यकोटी गणेश मंडळ दिग्रस व नवजीवन सामाजिक विकास केंद्र, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि.२४ सप्टेंबर रोजी कॉम्प्युटरद्वारे भव्य डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबिरात अल्पशः दरात चष्मे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिग्रस मधील मोठ्या मारोती मंदिरा मागे असलेले सुर्यकोटी गणेश मंडळ यंदाचे १४ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाज उपयोगी व सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. रेनवॉटर हार्वेस्टिंग, विविध स्पर्धा, शिबिरे अशाप्रकारचे कार्यक्रम याआधी मंडळाने राबविले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यासह दिग्रस शहरात डोळ्यांची साथ पसरली होती. याच पार्श्वभूमीवर भक्तांकरिता मंडळाने यंदा भव्य अशा डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ठीक ९ वाजता सामाजिक कार्यकर्ते प्रणित मोरे यांच्या हस्ते या डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार असून त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे. शिबिरामध्ये अमरावती येथील तज्ञ डॉक्टरांकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी गरजू नागरिकांकरिता अल्पशा दरात चष्मा देखील उपलब्ध करण्यात येणार असून या डोळे तपासणी शिबिराचा दिग्रस शहरातील तसेच आजुबाजुच्या ग्रामिण भागातील नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन, सुर्यकोटी गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.