पोटजातींचे धुरे खोदून फेका आणि बंजारा व्हा !डॉ. प्रकाश राठोड यांचे प्रतिपादन
#प्रा. ताराचंद चव्हाण संपादित ‘बंजारा समाजातील जातिअंताची विचारसूत्रे’ या ग्रंथाचे थाटात प्रकाशन !
दिग्रस :
“बंजारा समाज मानवतावादीच आहे. या समाजाच्या प्रारूपात जातीपातींचे आविष्कार दिसत नाहीत. जाती-पोटजातींच्या विभाजक प्रवृत्ती ह्या उच्च वर्णीयांकडून खालच्या वर्णात आलेल्या आहेत आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम बंजारासारखा वर्णबाह्य समाज पिढ्यानपिढ्या न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे जाती-उपजातींच्या अस्मितांचे धुरे खोदून फेकून बंजारा या महाअस्मितेत आपण सामील झालो तर बंजारा समाज हा या देशातील एक आदर्श आणि सुंदर समाज होईल” असे सडेतोड प्रतिपादन डॉ. प्रकाश राठोड यांनी केले. ते अ. भा. तांडा सुधार समिती द्वारा आयोजित प्रा. ताराचंद चव्हाण संपादित ‘बंजारा समाजातील जातीअंताची विचारसूत्रे’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष या नात्याने दिग्रस येथील वसंतराव नाईक योगाभवनात बोलत होते. या ग्रंथाचे प्रकाशन सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते झाले.
सौ. नाईक यांनी “बंजारा समाजात न्हावी बंजारा, धाडी बंजारा, सनार बंजारा, ढालिया बंजारा अशा अनेक उपजाती आहेत. ह्या पोटजातींचे निर्मूलन करून एकसंध बंजारा समाज साकार करण्यात आपण यशस्वी झालो तर आपली सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात फार मोठी ताकद निर्माण होईल” असे स्पष्ट मत मांडले. ग्रंथाचे भाष्यकार मा. दिगंबर राठोड यांनी “या ग्रंथाचे म्हणणे सर्वांच्याच हिताचे असून बंजारा समाजातील उपजातींमध्ये बेटी व्यवहार घडून आले तर या उपजाती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही” असा आशावाद व्यक्त केला. ग्रंथाचे दुसरे भाष्यकार डॉ. श्याम मुडे यांनी जातिव्यवस्थेची निर्दयी चिकित्सा करताना “जातिव्यवस्थेच्या मुळाशी योनिशुचिर्भूततेची संकल्पना असून जातिव्यवस्थेने स्त्रियांसकट या देशातल्या ऐंशी टक्के लोकांना गुलाम केले आहे” असे रोखठोक मत मांडले. भाष्यकार डॉ. विजय जाधव यांनी या ग्रंथाची चिकित्सा करताना “बंजारा समाजातील विविध उपजातींमध्ये सांस्कृतिक साम्य असून व्यवसायावरून पडलेले हे भेद आपण दूर केले तर संविधानसापेक्ष खरा भारतीय समाज आपण निर्माण करू शकतो असे अभ्यासपूर्ण विचार मांडले. ग्रंथाचे संपादक प्रा. ताराचंद चव्हाण यांनी “दुहेरी जातीव्यवस्थेने मला अपमानित केले. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेने आणि बंजारा समाजातील उपजातींनी दिलेल्या जखमांमुळेच या पुस्तकाचे संपादन करण्याची मला गरज भासली” या शब्दात आपले मनोगत मांडले. प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक नामा बंजारा यांनी केले. त्यांनी “जातिअंताची चळवळ लोकचळवळ झाली तर जातीव्यवस्थेचे राकट बुरुज आपण उद्ध्वस्त करू शकतो” असे प्रखर मत मांडले.
मा. रमेश मुंडावरे, मा. सुरेश शेरे, मा. सुनील राठोड, मा. राजू रत्ने, डॉ. सुभाष राठोड, मा. रमेश कारभारी (दिग्रस), मा. बळीभाऊ राठोड हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश राठोड आणि डॉ. विष्णू चव्हाण यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. सरदार राठोड यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. अर्जुन जाधव, विदर्भ प्रमुख जिनकर राठोड,वसंत राठोड, मदन जाधव, प्रकाश राठोड, प्रकाश चव्हाण, प्रबोधनकार मा. पंकजपाल महाराज, मा. श्रावण जाधव, प्राचार्य वसंतराव राठोड, प्राचार्य तोताराम राठोड, पत्रकार जगदिशभाऊ राठोड, पत्रकार जय राठोड, पत्रकार लक्ष्मण राठोड,नगर सेवक बाळू जाधव, मा. अनिलभाऊ राठोड, मा. अशोक रत्नपारखी, मोहन जाधव, शेषराव राठोड, सुधाकर जाधव, मनोहर राठोड,बाबुसिंण जाधव आर्णी तालुक्याध्यक्ष, डॉ गणेश राठोड मानोरा तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष रामराव चव्हाण, धर्मराज आडे, दामोदर राठोड, राठोड पटवारी,सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विष्णू आडे,उत्तम माळवी, कवी पी. के. पवार, कवी जय चव्हाण, रामराव चव्हाण गणेश राठोड, बबुसिंग जाधव, श्याम राठोड छायाताई जाधव, ललिता राठोड तसेच बंजारा समाजातील सर्वच उपजातींचे समाजबांधव अत्यंत उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थीती होते.