आश्रमशाळेतील बोगस शिक्षक भरतीतील शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करा !
संस्थासंचालकांच्या मुलांना विहित प्रक्रियेचा अवलंब न करता व गुणवत्ता डावलून नोकरीचे वाटप
मानोरा:- तालुक्यातील वाईगौळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत झालेल्या शिक्षक भरतीमध्ये गुणवत्ता डावलून, जाहिरात न काढता संस्थाचालक यांच्या मुलांना शिक्षक पदावर नियुक्ती करून अनियमितता झाल्याची तक्रार बाबुसिंग राठोड यांनी इमाव बहुजन कल्याण विभागाचे संचालक, पुणे आणि प्रादेशिक उपसंचालक, अमरावती यांच्याकडे केली आहे. या बोगस शिक्षकभरतीतील नियुक्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करावी, अशी मागणी केल्याने आश्रमशाळेतील शिक्षकभरतीचा विषय चर्चेला आला आहे.
सविस्तर वृत असे की, वाईगौळ येथील प्राथ. व माध्य. आश्रमशाळेत २००९ साली शिक्षक भरती घेण्यात आली. या भरती प्रकियेमध्ये एकुण ४ रिक्त जागा (HSC.D.ED) च्या होत्या या जागा भरण्याकरिता संस्थेचे सचिव यांनी दिशाभूल करत चुकीची जाहिरात देवून शासनाचे नियमाची होळी करत आपल्या मुलांना नियुक्त करण्याकरिता वत्तृपत्रात केवळ माध्यमिक आश्रमशाळेची २ सहायक शिक्षक पदाकरिता जाहिरात देण्यात आली होती. त्यापैकी एक रजा कालावधीकरीता (HSC Ded) आणि एक नियमित पदाकरीता (HSC CTC Ded) होती. सदर जाहिराती नुसार २ जागा रिक्त दाखवून, खोटी जाहिरात देवून भरती प्रकिया राबविण्यात आली. यामध्ये तक्रारकर्ता बाबूसिंग जयसिंग राठोड यांनी नियुक्ती संदर्भात आर्थिक फसवणूक झाल्या बाबत तक्रार करण्यात केली व त्या संदर्भात संस्थेचे सचिव गोविंद मोतिराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. भरती प्रक्रियामध्ये संस्थाचालक पदाधिकारी यांनी विहित प्रक्रियेचा अवलंब न करता, गुणवत्ता डावलून संस्थेचे सचिव गोविंद मोतीराम पवार यांनी स्वतःच्या मुलाला कला/कार्यानुभव शिक्षक जागा उपलब्ध नसताना नियुक्ती दिली. दौलत पवार या आपल्या मुलाचे हित जोपासत पात्रता लक्षात न घेता बेकायदेशीरपणे सबंधीत विभागाची पूर्व मान्यता न घेता सदर पद संस्था संचालक गोविंद मोतीराम पवार यांच्याकडून भरण्यात आले.
त.का.बा.संस्थेचे अन्य संचालक महेंद्र अरोडा यांचे चिरंजीव विक्की महेंद्र अरोडा यांनाही नियुक्ती देताना शासनाचे नियम डावलून, जाहिरात न देता व पूर्व मान्यता न घेता पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे ठराव घेऊन आश्रम शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे.
जी.एम.पवार आणि महेंद्र अरोडा ह्या संस्था संचालकांनी आपापल्या मुलांची नियमबाह्य नियुक्ती केल्याबाबत तक्रारीमध्ये नमुद केलेले आहे. सदर नियुक्ती मध्ये महा. खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली ,१९८१ मधील पदभरती संदर्भातील निकषाचे पालन केलेले नाही. तेव्हा आता इमाव बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक अधिकारी, अमरावती कशाप्रकारे भूमिका पार पाडतात याकडे वाशीम जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
कायदेशीर पूर्वमान्यता न घेता कला/कार्यानुभव शिक्षक भरती,बेकायदेशीर जाहीरात, बेकायदेशीर ठराव, बेकायदेशीर मुलाखत,पदाचा गैरवापर इत्यादी कारणाच्या आधारावर दौलत पवार आणि विक्की अरोडा यांची नियुक्ती आणि पदोन्नती मुळात बेकायदेशिर असल्याने सेवा तात्काळ प्रभावाने रद्द करुन त्यांना सेवेतून कमी करण्यात येण्याचा आदेश पारीत करावा. – बाबुसींग राठोड, वाईगौळ
जिल्हास्तरीय चौकशी समितीला संस्थेने पदभरती आणि पदोन्नती बाबतची कागदपत्रे पुरविली नाहीत, या पदभरतीची सखोल चौकशी गरजेची आहे. – ॲड. श्रीकृष्ण राठोड