बहुचर्चित आश्रम शाळा व्यवस्थापनाकडून शासनाच्या डोळ्यात काजळ
कार्यवाही पासून वाचण्यासाठी तक्रारीनंतर जमा करण्यात येत आहे निवासी आश्रम शाळेत चीज वस्तू
मानोरा :- तालुक्यातील वाईगौळ आणि आजूबाजूच्या परिसरातील भटके विमुक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक सुविधा व उच्च दर्जाच्या भौतिक सोयी देण्याच्या अटीवर अनुदान तत्त्वावर शासनाकडून मिळालेली निवासी आश्रम शाळा संस्थेचे खाजगी व्यवस्थापनातील अनियमितता, भ्रष्ट आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरविण्यात अपयश, निवासी विद्यार्थ्यांची संरक्षण करण्यात नापास झाल्याचा व इतरही त्रुटीपूर्ण गंभीर बाबींचा अहवाल आधीच गेलेला आहे. कारवाई पासून वाचण्यासाठी तक्रार झाल्यापासून तर आत्तापर्यंत शाळा व वस्तीगृहासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या जुळवणीमध्ये गुंग असल्याचे शाळेत दाखल झालेल्या पलंग भरलेल्या ट्रक वरून समोर येत आहे.
राज्यातील मागासवर्गीय असलेल्या भटके विमुक्त प्रवर्गातील नागरिकांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी अनुदान तत्त्वावर तालुक्यातील सहा गावात अनुदान तत्त्वावर खाजगी व्यवस्थापन संस्थांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळा शासनाकडून देण्यात आलेली आहेत.
शासनाच्या उदात्त धोरणाचा गैरफायदा वाईगौळ येथील प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रम शाळेचे खाजगी व्यवस्थापन समिती मधील पदाधिकारी घेऊन विद्यार्थ्यांची उपासमार करीत असल्याचे, विद्यार्थ्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यात अपयशी असल्याचे व शासनाकडून मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयाचे स्वहितासाठी उपयोग करीत असल्या संदर्भात तक्रार स्थानिक नागरिकांनी शासन आणि वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाकडे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय चौकशी समितीकडून तपासणी झाली असता प्रचंड अनियमितता व गंभीर त्रुटी वाईगौळ येथील निवासी आश्रम शाळा संदर्भात आढळून आल्याने जिल्हा समाज कल्याण उपायुक्त यांनी चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे या निवासी आश्रम शाळेवर प्रशासक नेमण्याची शिफारस अमरावती विभागीय प्रादेशिक उपसंचालक आणि उपसंचालक इतर मागास व बहुजन कल्याण विभाग पुणे याच्याकडे मागील महिन्यात पाठविल्याची खात्रीशीर माहिती आहे.
चौकशी अहवालात वास्तविकता समोर आल्याने पायाखालची माती सरकलेल्या संस्था व्यवस्थापनाने उरली सुरली प्रतिष्ठा धळीस मिळू नये यासाठी व वर्षानुवर्षे आपण गोरगरीब मागासवर्गीय नागरिकांच्या पाल्यांच्या नावावर शासनाची जी लूट केलेली आहे ती लपून रहावी यासाठी चौकशी समिती स्थापन झाली त्या दिवसापासून तर आतापर्यंत शाळेमध्ये नसलेले डेक्स, बेंच, कुलर, दूरचित्रवाहिनी संच, (टीव्ही सेट) शाळेत आणण्याचा सपाटा लावलेला आहे.
आज सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी ह्या वादग्रस्त शाळेच्या प्रांगणामध्ये निवासी विद्यार्थ्यांसाठी चौकशी समितीच्या अहवालात नसलेले लोखंडी पलंग मोठ्या ट्रक द्वारा आणून ठेवले गेल्याने शाळा व्यवस्थापन समिती कुणाच्या वरदहस्थाने हे सगळे कारभार करीत आहे हे व असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
जुनी बिले, त्यातील वस्तू आणि जिल्हास्तरीय समितीने घेतलेल्या नोंदी ह्या महत्त्वाच्या असून प्रादेशिक अधिकारी नवीन आलेल्या वस्तूंबाबत काय भूमिका घेतात त्यावरून पुढील भूमिका ठरवू. -ॲड.श्रीकृष्ण राठोड तक्रारकर्ता.