कब्बडीच्या पंढरीत ‘खेलो इंडिया’ चे केंद्र मिळावं
दिग्रस येथील क्रीडा प्रेमी व खेळाडूंची खासदार भावना गवळीकडे मागणी
दिग्रस :
देशभरात उघडण्यात येणाऱ्या ‘खेलो इंडिया’च्या केंद्रांपैकी एक केंद्र “कब्बडीची पंढरी” म्हणून देशभरात ओळख असलेल्या दिग्रस तालुक्यातील क्रीडा संकुल येथे मिळावं, यासाठी क्रीडा मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा अशी मागणी दिग्रस येथील क्रीडाप्रेमीं व खेळाडूंनी लोकसभा खा.भावना गवळी याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिग्रसला क्रीडा क्षेत्राचा दैदिप्यमान इतिहास आहे. ‘कबड्डीची पंढरी’ म्हणून आजही दिग्रसची देशभरात ओळख आहे. गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत अनेक कबड्डींची मैदाने दिग्रसच्या खेळाडूंनी गाजवली आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या कबड्डीपटू प्यारेलाल पवार यांना कबड्डीतील काळे तुफान म्हणून पदवी बहाल करण्यात आली. येथील काही आतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय, खेळाडू व नंतर प्रशिक्षक झालेल्यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून धनुर्विद्या या कीडा प्रकारात दिग्रस तालुक्यातील खेळाडू राज्यासह देशभरात आपला ठसा उमटवत आहे. कबड्डी नंतर आता धनुर्विद्येचे खेळाडू दिग्रस मध्ये घडत आहेत.
केंद्रीय क्रीडा आणि युवा विभागातर्फे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशभरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या उदात्त हेतूने येत्या ३ महिन्यामध्ये देशभरात ‘खेलो इंडिया’ ची एक हजार केंद्रे उघडणार असल्याची घोषणा केली. दिग्रस मध्ये घडणाऱ्या सर्वच क्रीडा प्रकारातील खेळाडूंकरिता हे ‘खेलो इंडिया’चे केंद्र दिग्रस येथील तालुका क्रीडा संकुल येथे व्हावे, अशी संपूर्ण दिग्रसकर कीडाप्रेमी नागरिक, खेळाडू व जनतेची ईच्छा आहे. त्यामुळे धनुर्विद्या अथवा कबड्डी या खेळांकरिता ‘खेलो इंडिया’चे केंद्र दिग्रस येथील क्रीडा संकुल येथे मंजूर करण्याकरिता दिग्रसकर जनतेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून दिग्रस येथील कीडाप्रेमी जनतेला ह्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी येथील क्रीडाप्रेमींनी खा. भावना गवळी यांच्याकडे केली आहे. खा.गवळी यांना निवेदन देतांना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, श्रीचंद राठोड, धनुर्विद्येचे राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र राठोड, आश्विन इगळे, राष्ट्रीय खेळाडू गौरव राठोड, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रणित मोरे सह क्रीडाप्रेमी व खेळाडू उपस्थित होते.