ग्रामस्थांच्या समयसूचकतेने जखमी वानराचे वाचले प्राण
पशुधन विकास अधिकारी यांनी दिली तत्पर सेवा
मानोरा:- तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वाईगौळ (अमरगड) येथे महान तपस्वी संत काशिनाथ बाबा यांच्या देवस्थान परिसरामध्ये जखमी अवस्थेत असलेल्या एका वानराला ग्रामस्थांनी समय सूचकता दाखविल्याने आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने नवजीवन मिळाले.
वाईगौळ या गावात झाडांचे प्रमाण अधिक असल्याने येथे नेहमी वानरांचे कळप या झाडावरून त्या झाडावर मुक्त संचार करीत असतात ज्यामध्ये मादी व लहान पिलांचा सुद्धा समावेश असतो.
तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा मंदिर परिसरामध्ये गंभीर जखमी अवस्थेतील वानर दिसताच ॲड. श्रीकृष्ण राठोड यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी व वन प्रशासनाला माहिती देताच डॉ. विजय रोम व त्यांचे सहकारी हेमंत जाधव यांनी वेळ न दवडता जखमी वानराला तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे जखमी वानराचे प्राण वाचू शकले. दरम्यानच्या काळात वन विभागाचे वन मजूर सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी वानराला प्रथमोपचार करून वनविभागाच्या वनमजुरांनी पुढील कारवाईसाठी आपल्या ताब्यात घेतले.
गंभीर जखमी मुक्या प्राण्यासाठी धावपळ करणारे अधिवक्ता राठोड, सुश्रुषा करणारे पशुधन विकास अधिकारी डॉ.रोम व ग्रामस्थांचे कौतुक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी अरविंद पाटील इंगोले यांनी केले आहे.