विठोलीच्या मारोतीला चांदीचा टोप अर्पण
दिग्रस :
तालुक्यातील विठोली मारोती येथील प्रसिध्द असलेल्या मारोतीला मारोती मंदिर संस्थान विठोलीच्या वतीने चांदीचा टोप अर्पण करण्यात आला आहे. ९० तोळ्यांच्या हा टोप असून दरवर्षी मारोतीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीमधून हा टोप साकारण्यातसाठी मंदिराच्या विश्वस्त समितीने पुढाकार घेतला.
नुकत्याच झालेल्या पौर्णिमेला पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या हस्ते हा चांदीचा टोप मारोतीच्या चरणी अर्पण करण्यात आला. पौर्णिमेला पहाटे विधिवत पुजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर अभिषेक व महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा टोप हनुमान जन्मोत्सवानिमीत्त अर्पण करण्यात येणार होता, मात्र विठोली गावामध्ये झालेल्या एका अप्रिय घटनेमुळे साध्या पध्दतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता. या घटनेचा तपास झाल्यानंतर हा टोप मारोतीच्या चरणी अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने, गोपनीय शाखेचे राजेश लाखकर, पोलीस पाटील गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मारोती संस्थानचे विश्वस्त गुलाबराव गावंडे, दिनेश गावंडे , बंडू पाटील, अरुण पाटील, उत्तम आडे, पवन गावंडे, गणेश राऊत, राजू हटकर, शंकर बंगळे, विलास वानखडे, रामराव पवार, नेमीचंद जाधव, किरण महाराज, प्रमोद पद्मावार, सीताराम पारधी सह गावकरी उपस्थित होते.