पोलीस ठाण्यासमोरील विद्युत डीपीला आग
◆दिग्रसच्या मुख्य रस्त्यावरील घटना
दिग्रस :
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस ठाण्यासमोरील विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीला सोमवारी (ता.०३ मार्च) सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. डीपी व डीपी खालील कचऱ्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलीस ठाण्यासमोरीलव विद्युत डीपी नेहमीच उघड्या अवस्थेत पाहायला मिळते. त्या डीपी खाली कचरा आणि वाळलेले गवत देखील असते. सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान डीपी मध्ये झालेल्या स्पार्किंगमुळे डीपीखाली असलेल्या वाळलेल्या कचऱ्याला आग लागली आणि वाढत वाढत आगीने डीपीला पेट घेतला. त्यात त्याच डीपीच्या वर असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून गळणाऱ्याऑइलमुळे आणखी भडका उडल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शींनी दिली. आग लागल्याचे कळताच पोलिसांनी धाव घेत त्या रस्त्यावरील वाहतूक वळती केली तर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे अश्विन इंगळे, रोहन पवार, सागर शेळके, नासिर शेख व सहदेव उघडे यांनी घटनास्थळी धाव घेत बकेटच्या साहाय्याने पाणी टाकून आग विझवली.
डीपीला लागलेल्या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती तर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले होते. विद्युत डीपीला आग लागल्याची घटना घडून देखील विद्युत वितरण विभागाचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. विद्युत डीपीला आग लागल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. विद्युत वितरण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा प्रकार घडल्याची ओरड ऐकायला मिळत आहे.