रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भिक मागून दिला निधी
◆दिग्रसच्या छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच व शिवप्रेमींचे अनोखे आंदोलन
दिग्रस :
कित्येक वेळा मागणी करून देखील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याची दुरुस्ती न केल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज विचार मंचच्या माध्यमातून दिग्रसच्या शिवप्रेमींनी ‘भिक मांगो’ आंदोलन करून भिक मागत जमा झालेला निधी प्रशासनाला पाठवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
गेल्या अनेक महिन्यांपासून दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्याच्या खालून जाणारी जलवाहिनी फुटल्याने अनेकदा रस्त्यावर पाणी साचून डबके तयार होते तर सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या स्मारकाची विटंबना होते. याची दुरुस्ती करण्याची मागणी कित्येकदा करूनही याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. याच दुर्लक्षित धोरणाचा येथील छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच व दिग्रसच्या शिवप्रेमींनी ‘भिक मांगो’ आंदोलन आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून कटोऱ्यात वाहनधारकांना तसेच येणाऱ्या-जाणाऱ्यांना भिक मागितली. विशेष म्हणजे शनिवारी दिग्रसचा बाजार असतो, त्यामुळे अनेक भिकारी भिक मागण्यासाठी येत असतात, त्या भिकऱ्यांनीदेखील शासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भिक दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भिक मागितल्यानंतर तेथून तहसील कार्यालयापर्यंत भिक मागत भिकेतून जमा झालेला निधी तहसीलदार मार्फत प्रशासनाला पाठविण्यात आल.या भिक मांगो आंदोलनात दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज विचार मंचच्या कार्यकर्त्यांसह श्रीशिवछत्रपती संघटना,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी, मुस्लिम गवळी समाज व विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक व समस्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, शहराची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, भिक द्या भिक द्या रस्त्यासाठी भिक द्या, झोपलेल्या प्रशासनाला भिक द्या, ५० खोके घेणाऱ्या सरकारचा निषेध असो, पन्नास खोके एकदम ओके यासह प्रशासनाविरोधी घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
आता कानात सांगतोय,मग कानशिलात वाजवु --
छत्रपती शिवरायांच्या नावाने दिग्रसमध्ये स्मारक उभारलं अन् या स्मारकाची दुरावस्था या प्रशासनाने केली. छत्रपतींच्या नावानं राज्य करायचं आणि सत्तेत आल्यावर दुर्लक्ष करायचं ही राजकीय लोकांची पद्धत आहे. या पद्धतीविरोधात 'अगोदर कानात सांग नाही ऐकलं तर मग कानशिलात हान',ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे.हे भिक मांगो आंदोलन म्हणजे शासनाला जागं करण्याचा पहिला प्रयत्न आहे. यापुढं तीव्र आंदोलन करू छत्रपतींच्या चौकातील तो रस्ताच जेसीबीने खोदून काढू,असा इशाराच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक पुनम पटेल यांनी यावेळी बोलतांना दिला.