बंजारा समाजातील शूरवीर, न्यायी, योद्धे यांच्याकडे इतिहासकार व संशोधकांचे दुर्लक्ष
●माजी शिक्षण उपसंचालक राम पवार यांचे मत
वाशिम :
बंजारा समाजातील शूरवीर, न्यायी, योद्धे यांचेकडे इतिहासकार, अभ्यासक, संशोधक यांनी हेतुपूर्वक दूर्लक्ष केले. कांही ठिकाणी जे उल्लेख आढळतात ते सुद्धा चिडून , संतापून प्रतिकुल अभिप्राय नोंदविलेले आहेत. त्यामागे समाजाचा खरा इतिहास व खरा चेहरा समोर येऊ न देण्याचा कुटील डावच दिसतो असे मत अमरावती विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी व्यक्त केले.
आस्थेवाईकपणे व नि:पक्षपणे बंजारा समाजाचा इतिहास न लिहिला गेल्यामुळे बंजारा समाजाला योग्य दिशा मिळाली नाही. या तत्कालीन समाजरचनेतील इतिहासकारांनी, लेखकांनी, विचारवंतांनी योग्य नोंद न घेतल्यामुळे बंजारा समाजाच्या जीवनसंघर्षाची ओळख समाजाला झाली नाही. नवीन पिढी तर त्यापासून आणखी लांब राहिली. बंजारा समाजातील नररत्नांचा, शुरविरांचा सुसंबद्ध इतिहास लिहिला गेला असता, त्यांचे कर्तृत्व व शौर्य भारतीय इतिहासाचा विषय झाला असता, त्याचे बलिदान उपेक्षित राहिले नसते तरच त्यांच्या जगण्याला न्याय मिळाला असता व पुढच्या पिढीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असती परंतु, दुर्दैवाने बंजारा समाजाचा इतिहास कवने व बोलीभाषा यातच सीमित राहिला आणि अन्य लोकांना त्याचेशी काही घेणेदेणे नव्हते असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
आजचा काळ हातात तलवारी व बंदुका घेऊन युद्ध करावयाचा नाही. तथापि, विचाराने युद्ध करावयाचा आहे. पूर्वीच्या काळात युद्ध करण्यासाठी आपला विजय व्हावा यासाठी अस्त्र, शस्त्र व विद्या जेथे मिळेल तेथुन प्राप्त करण्याचे प्रयत्न होत होते. प्राप्त अस्त्र व शस्त्र याचा वापर करून विजय मिळविण्याचा प्रयत्न संधी मिळताच केला जात होता. आताचा काळ विचाराने लढण्याचा असल्यामुळे ऐकण्यातुन, वाचनातून जेथून मिळेल तेथुन ज्ञान प्राप्त करून योग्य वेळी त्याचा वापर करणे आवश्यक झाले आहे. जो असा प्रयत्न करणार नाही, त्याचा पराभव निश्चित आहे त्यामुळे बंजारा समाजातील तरुण पिढीने अधाशीपणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे मत पवार यांनी मांडले.