पदवीधर निवडणूकीत रणजीत पाटील यांचा घात कुणी केला ?
◆अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीच्या पराभवावर चिंतन
अमरावती :
नुकताच अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला. या निकालामध्ये भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पुर्वीची निवडणुक जिंकल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच रणजीत पाटील यांनी 2023 च्या निवडणुकीची तयारी सुरू ठेवली होती, असे असतांना मागील एक वर्षा पासुन रणजीत पाटील संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढतांना दिसत होते. त्यांच्या मेहनतीला तोड नव्हती परंतु परिचित नसणारे धीरज लिंगाडे वेळेवर फॉर्म भारतात, प्रचाराचा धडाका न करता संयमाने प्रचाराची औपचारिकता पूर्ण करतात आणि निवडुन येतात याला आश्चर्य म्हणावे लागेल. त्यामुळे रणजीत पाटलाचा घात कुणी केला हा प्रश्न सध्या चर्चिल्या जात आहे.
रणजित पाटील यांच्या पराभवाला केवळ जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतचे कारण कारणीभूत आहे हे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न ऐरणीवर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर येथील अधिवेशनात टोकाची भुमिका घेवुन जुनी पेन्शन देता येणार नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे जुनी पेन्शन मिळावी या करिता आंदोलन करणारे पेटुन उठले व त्यांनी भाजपा विरोधात मतदान केले त्यामुळे रणजीत पाटलाचा घात झाला, दुसरा घात झाला तो असा की, सुमारे आठ हजार मतपत्रिका बाद ठरल्या त्या मतपत्रिकेवर प्रथम पसंतीचे मतदान नाही तर केवळ रणजीत पाटील यांच्या नावासमोर 2 चा आकडा टाकल्या गेला, तिसरा घात झाला तो मित्र पक्षाकडून राज्यात भाजपा व शिंदे गटाची युती असताना शिंदे गटाचे मातब्बर मंत्री यांनी स्वतःला या निवडणुकीपासून दूर ठेवले, चौथा घात झाला तो म्हणजे विरोधकांची मताची विभागणी करण्यात यावेळी भाजपाला अपयश आल्याने धीरज लिंगाडे यांना गठ्ठा मते पडली आणि शेवटचा घात म्हणजे रणजीत पाटील यांचे कार्यकर्ते मतदाराच्या अपेक्षा पुर्ण करू शकले नाही. या सर्वच कारणांची चर्चा सध्या संपूर्ण मतदार संघात सुरू होती आणि त्यामुळेच रणजीत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. रणजीत पाटील यांचा अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीत ज्या कारणांमुळे पराभव झाला, त्या कारणांचे चिंतन करण्याची गरज असल्याचे निवडणूकांच्या अभ्यासकांचे मत आहे.