शेतकऱ्यांच्या वेदना आम्ही मुलांना सांगणार आहोत की नाही? – हेरंब कुलकर्णी.
दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
यवतमाळ जिल्ह्याची ओळख देशात शेतकऱ्यांची स्मशान भूमी अशी आहे. शेतकरी वेदनेने आणि परिस्थितीने अतिशय गंजला असून त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. समाजाचा एक मोठ्ठा घटक दुःखाने असा विव्हळत असतांना, खितपत पडला असतांना त्याची दखल शिक्षण नावाची संवेदनशील यंत्रणा घेणार आहे की नाही? शेतकऱ्यांची वेदना आम्ही मुलांपर्यंत पोचविणार आहोत की नाही? असा थेट सवाल हेरंब कुलकर्णी यांनी केला. ते शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर शिक्षकांशी दिग्रस येथे संवाद साधत होते.
साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात साने गुरुजींवर शंभर व्याख्यानाचा संकल्प प्रसिद्ध वक्ते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गेली चार दिवस ते विदर्भात असून अमरावती जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळ जिल्ह्यातील नेर व यवतमाळ येथील व्याख्यान
आटोपून दिग्रस येथे आले होते. दिग्रस येथील हे त्यांचे ५६ वे व्याख्यान होते. मराठी साहित्य रसिक मंडळ आणि विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य नितीन राऊत, मुख्याध्यापिका अनिता नगराळे, प्राचार्य नितीन धनवंत, मुख्याध्यापक प्रदीप चोपडे, प्रा डॉ रुपेश कऱ्हाडे उपस्थित होते. गोदावरी अर्बन बँक आणि मिर्जा अफजल बेग यांच्या सहकार्यातून आयोजित या व्याख्यानात पुढे बोलतांना हेरंब म्हणाले की, गाणी, गप्पा आणि गोष्टीतून शिक्षकांनी मुलांशी बोलायला हवं. त्यांना बोलतं करायला हवं. संवाद साधायला हवा. संवादातून समजातील समस्यांची दाहकता या येणाऱ्या पिढीपर्यंत पोचवायला हव्यात. शिक्षकांचा समाजाशी आणि मुलांशीही कनेक्ट थोडा कमी झाल्याची खंत व्यक्त करताना विद्यार्थ्याला विचार करायला शिकवा. असं आवाहन त्यांनी केलं. साने गुरुजींच्या आयुष्यातील शिक्षक म्हणून घडलेल्या घटनांचे धावते पण तेवढेच हृदयस्पर्शी चित्रण त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले. यावेळी ऐकणारे शिक्षक मंत्रमुग्ध झाले होते. साने गुरुजींच्या आयुष्यातून आपण उत्कटता, संवेदनशीलता, उस्फुर्तता, नावीन्य, कणव, प्रेम, दया, कष्ट करण्याची वृत्ती घेतली पाहिजे. माऊली म्हणून संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर फक्त साने गुरुजींना ओळखले जाते. ते मातृहृदयी होते. मात्र मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी प्रसंगी ते कणखर सुध्दा व्हायचे. त्यांचा हाच कणखरपणा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्यावर ही अनेक वेळा दिसला आहे. म्हणूनच साने गुरुजी अजूनही महाराष्ट्रातील जन माणसाच्या मनात आहेत असे प्रतिपादन हेरंब कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण बारशे यांनी तर वक्त्याचा परिचय गिरीश दुधे यांनी करून दिला. संचालन आमीन चौहान यांनी तर आभार हेमंत दळवी यांनी मानले. विद्यानिकेतन शाळेच्या मुलींनी संगीत शिक्षक अशोक मोरेकर, पवन इंगोले यांच्या मार्गदर्शनात शारदास्तवन आणि जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सादर केली. कला शिक्षक मयूर राऊत यांनी साने गुरुजींची सुंदर रांगोळी साकारली होती. फलकलेखन विनोद दुधे यांनी तर शशांक दुद्दलावार, गजानन पाटील यांनी सहकार्य केले. व्याख्यानाला शिक्षक, पालक, विदयार्थी व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.