नवनिर्वाचित महिला आमदारांनी ग्रामीण रुग्णालयातील महिला रुग्णांची कुचंबना थांबवावी ?
शहर व तालुक्यातील माता भगिनींची मागणी
मनोरा:– साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
शहर आणि तालुक्यामध्ये ५०% असलेल्या माता, भगिनींचे ग्रामीण रुग्णालयांमध्ये मागील अनेक वर्षांपासून होत असलेली उपेक्षा विधानसभा निवडणुकीत महिलांनी प्रचंड मतदान करून निवडून आणलेल्या नवनिर्वाचित आमदाराकडून थांबवून महिला रुग्णांच्या हेळसांडीला लगाम लागण्याच्या आशा पल्लवीत झाले असल्याचे बोलले जात आहे.
शहरात ग्रामीण रुग्णालय आणि आपला दवाखाना असून दहा हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे लोकप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे आतापर्यंत पूर्णतः बोजवारा उडालेला होता.
वैद्यकीय अधिकारी कर्मचारी याच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमर्जीने दवाखान्यामध्ये येणे, जाणे रुग्णांना ताटकळत ठेवणे, वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून न देणे या बाबी येथे अतिसामान्य आहेत.
लोकप्रतिनिधी स्थानिक नसल्याने ग्रामीण रुग्णालय व आपला दवाखाना मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाची समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.
शहर व तालुक्यात कुठेही अपघात झाल्यास गंभीर रुग्णांना तातडीने प्रथमोपचार मिळणे सुद्धा उपरोक्त दोन्ही रुग्णालयांमध्ये दुरापास्त असते वेळेवर कधीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी वाहनाद्वारे अद्यावत वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी बाहेर जाण्याशिवाय येथे पर्याय नसल्याचे जगजाहीर आहे.
रुग्णांना लागणारे वैद्यकीय साहित्य औषध साठा नसणे ही नित्याची बाब असून यासाठी शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांनी यापूर्वी पाठपुरावा केलेला आहे.
गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले असता कुठलीही वैद्यकीय मदत येथे मिळत नसून दूरवरचे कुपटा आणि पोहरादेवी येथे अशा महिलांना जाण्याची शिफारस करण्यात येते.
शहर व तालुक्यातील महिलांचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची असल्यास ती सोय सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध नसल्यामुळे महिला व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड शारीरिक व मानसिक आणि आर्थिक अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागत असल्याने या अडचणी नवनिर्वाचित महिला आमदार समजून घेऊन शासन स्तरावर सोडविण्यासाठी पुढाकार घेतील अशा आशा विशेषतः महिला आणि इतरही रुग्णांमध्ये पल्लवीत झाले आहेत.
फोटो–