ईंगलवाडीतील निवासी माध्यमिक आश्रम शाळेची मान्यता रद्द करा !
इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या संचालकांकडे लेखी मागणी
मानोरा —साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क सामाजिक दृष्ट्या माघारलेल्या जाती-जमातीच्या नागरिकांचे पाल्य विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उच्चभौतिक सुविधेची निवास व्यवस्था मिळावी यासाठी शासनाकडून खाजगी आस्थापनांद्वारे संचालित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांकरिता देण्यात येणारे शतप्रतिशत अनुदान तालुक्यातील काही शिक्षण संस्थांनी भ्रष्टाचाराचे कुरण केले असून जिल्हास्तरीय प्रशासनाकडून त्यांचे हितरक्षण केले जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील जागरूक नागरिकांकडून महाराष्ट्राच्या इतर मागास व बहुजन कल्याण संचालनालयाकडे केल्या जात आहे. इंगलवाडी येथील माध्यमिक आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याच्या लेखी मागणीची भर आता त्यात पडली आहे.
इंगलवाडी येथे खाजगी शिक्षण संस्थेद्वारा संचालित आणि राज्य शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून शतप्रतिशत अनुदान घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी माध्यमिक निवासी आश्रम शाळा मागील अनेक वर्षांपासून चालविली जात आहे.
वटफळ, मेंद्रा, हिवरा, रुई, गोस्ता या इंगलवाडी पंचक्रोशीतील डोंगराळ भागातील भटके विमुक्त प्रवर्गातील नागरिकाच्या पाल्यांना एकाच ठिकाणी उच्च भौतिक सुविधांनी युक्त निवासी वस्तीगृहाची सोय असलेली आश्रम शाळा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शासनाने परवानगी दिलेली आहे.
ईंगलवाडी येथील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जिल्हा प्रशासनातला हाताशी धरून खाजगी शिक्षण संस्था संचालकांनी नियम व निकषांना धाब्यावर बसवून खोटी पटसंख्या कागदोपत्री दाखवून शासकीय अनुदानाचे लूट चालविली असल्याची लेखी तक्रार या विभागाचे पुणे येथील संचालकांकडे केली आहे. उपरोक्त निवासी माध्यमिक आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याची आणि शासकीय अनुदान लाटणाऱ्या या माध्यमिक निवासी आश्रम शाळा संचालकांना चौकशीसाठी पारदर्शक समिती नेमण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.
आर्थिक अपरातफर करणाऱ्या संस्था संचालकांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाईची मागणी तथा चौकशीच्या दरम्यान आम्हाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची मागणी सुद्धा प्रशांत देवानंद तायडे यांच्याकडून करण्यात आली आहे.
फोटो—