दारू माफियांना शेंदुर्जना परिसरात पोलीस प्रशासनाकडून मोकळीक
देशी दारूच्या बॉक्सचे राजरोस वाहतूकीचे आरोप
मानोरा :—(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)तालुक्यातील शेंदुर्जना आढाव येथून आजूबाजूच्या तांडे, पाडे,वाडी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध वाहनांद्वारे देशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होऊनही स्थानिक पोलीस चौकीतील कर्मचारी याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याने सेंदुरजना आढाव पंचक्रोशीतील असंख्य कुटुंबे देशी दारूच्या ह्या महापुराने बाधित होत असल्याच्या गंभीर चर्चा होत आहेत .
सेंदुरजना आढाव हे बाजारपेठ आणि शाळा, महाविद्यालय असलेले मोठे गाव असून आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाकडून पोलीस चौकी निर्माण करण्यात आलेली आहे.
शेंदुर्जना येथून आजूबाजूच्या परिसरामध्ये दूचाकी आणि इतर वाहनाच्या साह्याने देशी दारूच्या बॉक्सची राजरोसपणे बेकायदेशीर वाहतूक केल्या जाते याची माहिती स्थानिक पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना असूनही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या अशा दारूच्या पेट्या गावोगावी पोहोचविणाऱ्यावर पोलीस चौकीतील कर्मचारी कुठलीच कारवाई करीत नसल्यामागे कुठले कारण असावे असा सवाल या निमित्याने या भागातील नागरिक करीत आहेत.
बॉक्स—
मानोरा पोलीस प्रशासनाने गत आठवड्यात हातभट्टीची गावठी दारू निर्मितीचे असंख्य अड्डे उध्वस्त केलेत आणि अवैधपणे देशी,विदेशी दारू बाळगणारे व वाहतूक करणाऱ्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई केली असताना याच तालुक्यातील शेंदुर्जना आढाव पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांचे हात मात्र कुणी बांधले आहे असेही प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत.