पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे शनिवारी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार
पोहरादेवी (दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार , विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. येथे पोहोचल्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर येथे आयोजित मुख्य सभेत जनतेला संबोधित करतील.
पोहरादेवी (ता. मानोरा) बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि आई जगदंबेचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे बंजारा येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून लोकनेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते. आज जागतिक दर्जाचे असे हे संग्रहालय तयार झाले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे.