बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वनार्टी’ महत्वपूर्ण कार्य करेल
समाजाच्या हितासाठी अतिशय चांगला निर्णय – पालकमंत्री संजय राठोड
वाशिम, दि.३० सप्टेंबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) : बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात राज्य सरकारला यश आले आहे. बार्टीच्या धर्तीवर “वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था” वनार्टी स्थापन करण्याच्या अनुषंगाने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत “वनार्टी” या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी हा निर्णय समाजाच्या हितासाठी अतिशय चांगला आहे, असे सांगून समाजाच्यावतीने शासनाचे आभार मानले.
समाजातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने संशोधन व अभ्यास करून समाजाच्या विकासाकडे प्रकर्षाने लक्ष वेधण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वनार्टी’ महत्वपूर्ण कार्य करेल, असे पालकमंत्री म्हणाले. बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये ‘बार्टी’च्या धर्तीवर “वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था” वनार्टी स्थापन करण्याची मागणी होती. आज राज्य शासन मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मागणीच्या अनुषंगाने संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत नियम आठ अन्वये, मुंबई येथे ‘वनार्टी’ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
याचा गोर बंजारा समाजासह काही प्रमाणात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास देखील फायदा होणार आहे. प्रामुख्याने ‘वनार्टी’द्वारे सदर प्रवर्ग समाज व घटकातील विद्यार्थी, युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, न्यायव्यवस्था, सीए, सीएस, कायदा, यूजीसी, नेट आणि सेट तसेच कॅट, नीट, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांच्यासह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विविध टप्प्यांवर प्रशिक्षण घेणे, विविध लष्करी, पॅरामिलिटरी सर्विसेस परीक्षांसाठी प्रशिक्षण, लक्ष गटांच्या उमेदवारांना प्रशिक्षण, विविध उद्योग आणि संस्थांद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी उमेदवारांना प्रशिक्षण, परीक्षांची चाचणी मालिका, व्यक्तिमत्व विकास चाचणी, मुलाखती, शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, एचएससी, एसएससी आणि पदवीधर तसेच उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभियोग्यता वादाविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच लक्ष गटांच्या विविध समुदायांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासावरील संशोधनासंबंधी माहितीचे संकलन आणि प्रसार करण्यासाठी तसेच विविध उपक्रम, प्रकल्प कार्यक्रम, योजना इत्यादी स्वतःहून किंवा सरकारी, निमशासकीय संस्था, खाजगी संस्था इत्यादींच्या सहकार्याने ‘वनार्टी’ उपक्रम राबवणार आहे.
बंजारा समाजातील विद्यार्थ्यांच्या व तरुणाच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे समाजबांधवांच्यावतीने पालकमंत्र्यांनी आभार मानले.