पंचनाम्याचे सोंग कशाला, सरसकट मदत द्या- देवानंद पवार
अतिवृष्टीने कारंजा, मानोरा भागातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान
मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
अतिवृष्टीमुळे वाशीम जिल्हयातील कारंजा, मानोरा भागातील शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या भागातील कापूस, सोयाबिन, तुरीसह सर्वच पिके खरडून गेली. हजारो हेक्टर जमीनीवरील पीक संपुष्टात आल्याने सरकारने पंचनाम्याचे सोंग न करता तातडीने सरसकट मदत देण्याची मागणी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशीम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार यांनी केली आहे.
जिल्हयात सर्वदूर पाऊस झाल्याने कापूस, सोयाबिन, तुर, ज्वारीसह सर्वच पिकांचे नुकसान झाले असतांना केन्द्र तसेच राज्य सरकार गंभीर दिसून येत नाही. विमा कंपन्यांनाही काही देणेघेणे नाही असे दिसून येते. गेल्या आठ दिवसापासून संतत तसेच मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतक-यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला असून सरकारने शेतक-यांना सरसकट मदत देण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली आहे. गेल्या काही वर्षापासून वाशीम जिल्हयात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागीलवर्षी सुध्दा परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले, दुसरीकडे पिकविमा कंपनीने सुध्दा मोजक्याच शेतक-यांना पिकविमाचा लाभ दिला. आता तीच परिस्थिती खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा वाशीम जिल्हयात आली आहे. असे असतांना विमा कंपन्यांच्या धोरणानुसार ७२ तासाचे आंत तक्रारी कराव्या लागतात, जे अत्यंत चुकीचे आहे. मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असतांना त्या पिकांना सावरणार की नेटवर्क असेल तिथे जाऊन माहिती अपलोड करणार हे आता सरकारनेच सांगावे असा प्रश्नही देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस सरकारला दिसत नाही का? शेतक-यांचे अवसान फाटले असून तो शेतात धाय मोकलून रडत आहे. त्याचे अश्रृ या सरकारला दिसत नसेल आणि त्याचा टाहो सुध्दा ऐकायला येत नसेल तर कानाखाली आवाज काढून सरकारला जागे करण्याची वेळ आहे का? असा प्रश्नही देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरीही लाडका असावा
भाजपाला लोकसभा निवडणूकीत फटका बसताच त्यांना राज्यातील बहिणी लाडक्या झाल्या. अनेक अटी शिथील करुन लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैशाचे वाटप केले जात आहे. आज राज्यातील शेतकरी संकटात असतांना सरकारला त्यांचे अश्रु पुसण्यासाठी वेळ नाही. उलट अनेक अटी लाऊन त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव रचल्या जात आहे. सरकारला शेतकरी लाडका का वाटत नाही? असा खोचक सवाल उपस्थित करुन शेतक-यांना सरसकट मदत देण्याची देवानंद पवार यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी
देवानंद पवार यांनी आज धावंडा, गोंडेगाव, शेंदोना भागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधला.
भूषण सुरेश चव्हाण,
दत्ता मोतीराम बोरचाटे,
राजेश संगीतराव राऊत,
नरेंद्र देवराव राऊत,
रामराव नागोराव फुसांडे,
यशवंतराव नागोराव पुसांडे,
दयाळू नरेंद्र राऊत, विष्णु हिरामण जाधव, अरुण नागोराव पुसांडे यांनी आपल्या व्यथा सांगितल्यानंतर शेतक-यांच्या या वेदना सरकार पर्यंत पोहोचवून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी त्यांचेसोबत जिल्हा कॉग्रेस कमेटीचे वरीष्ठ उपाध्यक्ष इप्तेखार पटेल, मानोरा शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष हाफीज खान, गोपाल चिश्तळकर, राजू ससाणे, प्रा. विठ्ठल आडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे देवानंद पवार यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी यांना तातडीने भ्रमणध्वनीने संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली.