दिग्रस मधील सेवानगरी येथील नागरिक स्वतः करत आहेत परिसराचे संरक्षण
‘रात्रीची गस्त’ उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
दिग्रस:-(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
स्थानिक दिग्रस शहरातील फार्मसी कॉलेज मागील परिसर सेवानगरी येथील नागरिक दररोज रात्री आपल्या व आजूबाजूच्या परिसरामध्ये गस्त घालून स्वतःच आपल्या परिसराचे संरक्षण करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानगरी परिसरात व आजूबाजूच्या नवीन खुल्या लेआउट मध्ये रात्रीच्या वेळी अनेक दारुडे आणि व्यसनी युवक बिंदिकतपणे सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन करून परिसरामध्ये धिंगाणा घालत होते. तसेच सिगरेट,बिडी, तंबाखू, गांजा सारखे व्यसन सुद्धा अनेक बाहेरील युवक येथे येऊन करताना आढळत होते. परिसराशी काहीही संबंध नसलेल्या अनेक अनोळखी लोकांचा वावर या ठिकाणी वाढत चालला होता. ज्यामुळे दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी येथील रहिवासी संदीप रत्नपारखी यांच्या घरी भर दिवसा चोरी झाली. परंतु इतके दिवस उलटूनही चोर मात्र सापडले नाहीत. पोलीस प्रशासन अनेक गुन्ह्यांवर काम करत असून पोलिसांना हातभार लावण्यासाठी व तसेच आपले नागरी कर्तव्य समजून सेवानगरी येथील नागरिक परिसरामध्ये दररोज रात्री नित्य नियमाने गेल्या पंधरा दिवसापासून गस्त घालत आहेत.
या दरम्यान त्यांना आढळणारे अनेक व्यसनी, दारूडे चिडीमार आणि धूम्रपान करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच काही संशयित वाटत असलेल्या लोक सर्वांना ते परिसरातून पिटाळून लावत आहेत. यामुळे अशा लोकांना चांगला जरब बसला आहे. या ठिकाणी येण्यास अनेक जन धजावत आहेत. या रात्रीच्या गस्तीमुळे पोलिसांना तर मदत होतच आहे. याशिवाय परिसराचे संरक्षण देखील होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर यामुळे नक्कीच वचक राहणार आहे. यांचा आदर्श घेऊन संपूर्ण दिग्रस शहरातील परिसरांमध्ये नागरिकांनी असा उपक्रम राबवला पाहिजे. जेणेकरून गुन्हेगारीवर आळा बसेल. सेवानगरीवसियांच्या या उपक्रमाचे दिग्रस मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.