पोहरादेवीचा समावेश “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत” करण्याची मुस्लिम समाजाची मागणी
निवेदनाची तात्काळ दखल, जिल्हा समितीकडून प्रस्ताव शासनास सादर
दिग्रस :- (साप्ताहिक दिवस एक्स्प्रेस न्यूज नेटवर्क)
समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” जाहीर केली आहे. या योजनेत राज्यातील 66 व देशातील 73 अशा 139 तीर्थ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यात वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत पोहरादेवीचा समावेश करण्याची मागणी करणारे निवेदन दिग्रस येथील मुस्लिम समाजाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना नुकतेच दिले आहे .
दिग्रस लगतच असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीला दरवर्षी राज्यासह कर्नाटक , आंध्र प्रदेश , तेलंगणा राज्यातील आणि देशातील कानाकोपऱ्यातुन भाविक मोठ्या संख्येत भेट देत असतात. पोहरा देवीला बंजारा समाजाची काशी म्हणूनच सर्वदूर ओळखतात.
पोहरादेवीचे महत्त्व लक्षात घेता या तीर्थक्षेत्राचा समावेश “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत” करण्याबाबत निवेदनातून महाराष्ट्र शासनास विनंती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाने ही मागणी केली आहे हे इथे उल्लेखनीय!
तसेच राज्याची 12 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. तरीही मुस्लिम समाजाच्या केवळ राजस्थानमधील अजमेर या राज्याबाहेरील एकमेव तीर्थक्षेत्राचा समावेश या यादीत केलेला आहे. ही अतिशय अन्याय कारक, संतापजनक आणि मुस्लिम समाजाला अव्हेरणारी बाब आहे. शासन निर्णयात 139 तीर्थक्षेत्रात केवळ एका स्थानाचा समावेश करून राज्य शासन मुस्लिमांना डावलत तर नाही ना? अशी खंतही या निवेदनातून व पालकमंत्र्यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाने व्यक्त केली.
सदर निवेदनाची पालकमंत्री संजय राठोड यांनी तात्काळ दखल घेत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना” जिल्हा समितीची बैठक लावली. यवतमाळ येथे आयोजित या बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व मुस्लिम समाजाचे निवडक प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यात पोहरादेवी जि. वाशिमसह बाबा कंबलपोष दर्गाह आर्णी , सरकार सोनापीरर दर्गाह माहूर जि. नांदेड आणि बाबा ताजुद्दिन दर्गाह नागपूर यांचा समावेश करण्याबाबत प्रस्ताव पारित करून तो शासनास पाठवण्यात आला आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम फोरम यांच्या पुढाकाराने दिग्रस येथील मुस्लिम समाजातील नागरिकांनी हे निवेदन देवून उपरोक्त मागणी केली होती.
त्याची तात्काळ दखल घेत शासनास प्रस्ताव सादर केल्याबाबत डॉ एपीजे कलाम फोरमचे अफजल बेग , दिग्रस नगर पालिकेचे माजी सभापती फिरोज पटेल , सक्रिय सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई मणियार , फिरोज खान, अजीम खान, हाजी करीम शेख, हाजी हारून इसानी, जावेद परसुवाले, फारुक अहेमद , आसिफ शेख, तस्लिम खान पेढेवाले, तौहिद खान, जिशान पटेल यांनी पालकमंत्री संजय राठोड यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.