आकाश चव्हाण आता प्रो कबड्डी खेळताना दिसणार चक्क टीव्हीवर !
बंगाल वॉरियर्स साठी तालुक्यातील देवठाण्याच्या क्रीडापटूची निवड
मानोरा– बालवयापासून मनामध्ये कबड्डी हा एकच ध्यास ठेवलेल्या आकाशचे प्रो कबड्डी ११ मध्ये बेंगॉल वॉरियर्स या संघामध्ये त्याची निवड झाली असून आता तो चक्क टीव्हीवर या संघाकडून रेडर म्हणून खेळताना दिसणार आहे.
प्रसार माध्यमावर हि बातमी कळताच आकाशवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सामाजिक ,राजकीय व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीनी त्याच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
मानोरा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवठाणा या इ्वलूशा गावातील आकाशने अगदी लहानपणापासूनच कबड्डीचाच ध्यास मनामध्ये ठेवली होती त्याची मेहनत फळाला आली व आज तो चक्क प्रो कबड्डी मध्ये निवडला गेला.आकाश अगदी लहान मुलांमध्ये खेळायचा देवठाणा या गावाला कबड्डीचा खूप मोठा वारसा आहे येथील कबड्डी खेळाडूंनी व स्वतः त्याच्या काकांनी जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात कबड्डी चमकदार कामगिरी केलेली आहे. त्याचेच एक फलित म्हणून आज आकाश घडला. परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या आकाशने कबड्डी हेच आपलं करिअर समजून त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. आई वडील तटपूंजी शेती व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात आकाशला त्यांनी त्याच्या ध्येयापासून कधी रोखले नाही. वर्षभर विदर्भ व विविध संघाकडून राज्यस्तर असो राष्ट्रीय स्तर असो सतत खेळत राहायचा. तो फक्त पावसाळ्यातच काही दिवसांकरिता घरी यायचा मुळात त्याने हे यश कुठल्याही मूलभूत सुविधा नसताना कुठलंही प्रशिक्षण अकॅडमी न लावता स्वबळावर त्यांनी हे संपादन केलं आहे. कबड्डी हा मर्दानी खेळ याच्यात खेळाडूंचे कसब पणाला लावत असते. त्याच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये एक नवचैतन्य आनंद उत्साह निर्माण झाला असून. आकाश हा आता येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत राहील. आकाश च्या या यशाचे पूर्ण श्रेय त्याचे आई-वडील तथा कुटुंब तसेच त्याचे मित्र ज्यांनी त्याला क्षणोक्षणी मदत केली तसेच ज्यांनी त्याला इथपर्यंत पोहोचविले ते सर्व गुरुवर्य वरिष्ठ,मार्गदर्शक यांना दिले आहे.