अखेर वाईगौळ आश्रमशाळेतील पदभरती प्रक्रिया रद्द
संचालक, ईमाव बहुजन कल्याण, पुणे यांच्या ५० हजार रुपयांच्या दंडात्मक आदेशाने चपराक
मानोरा:- वाईगौळ ता.मानोरा येथील आश्रमशाळेत ५ सहायक शिक्षक पदाकरीता आणि ३ शिक्षकेत्तर पदाकरीता सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरू केली होती. शाळा व्यवस्थापनाने वर्तमानपत्रात अवैध जाहिरात देत दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी आश्रमशाळेत मुलाखती आयोजित केल्या होत्या. परंतु या जाहिराती नियमानुसार न काढल्याने ॲड. मनोहर राठोड यांनी जिल्हा कार्यालयात तक्रार दाखल केली. तसेच मुलाखती जाहिरातीमध्ये निर्धारित केलेल्या वेळेत आणि ठिकाणी न होता बेकायदेशररित्या अध्यक्ष यांच्या निवास स्थानी झाल्याबाबत सक्षम अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले होते. त्यांनतर दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष यांच्या सुनेला महिला अधीक्षिका म्हणुन रुजू देखिल करण्यात आले. तसेच इतर ६ कर्मचारी यांना दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी सेवेत रुजू केले आहे. त्यामध्ये कोषाध्यक्ष आणि सदस्य यांच्या पुतण्याचा देखिल समावेश होता. ही बाब लक्षात आल्यानंतर ॲड. श्रीकृष्ण राठोड आणि ॲड. मनोहर राठोड यांनी सदर नियुक्त्या या कशाप्रकारे बेकायदेशिर आहेत, याबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिले होते. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि अध्यक्ष/सचिवांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. बिंदू नामावली अद्ययावत व प्रमाणित नसणे, जाहिरात प्रसिद्ध करतांना जाहिरातीच्या मसुद्याला सक्षम अधिकारी यांची परवानगी न घेणे, नियमानुसार निवड समितीची स्थापना न करणे, अप्पर मुख्य सचिवांनी दिलेल्या पदभरतीच्या आदेशातील अटी- शर्तींचे पालन न करणे, आश्रमशाळा संहितेतील तरतुदींचे पालन न केल्याने पदभरती नियमबाह्य ठरवली होती.
परंतु संस्थेच्या पदाधिकारी यांनी आपली मुजोरी करत सर्व सातही उमेदवारांना कर्मचारी दैनंदिन हजेरी पुस्तकावर सह्या करण्यास आणि शासकीय दस्तऐवजात फेरबदल केले. सहा महिने त्या सर्व सातही उमेदवारांची फसवणूक करीत विनामोबदला शाळेवर श्रम करावयास लावले आणि ज्यावेळी ॲड. श्रीकृष्ण राठोड यांनी पुणे येथिल संचालक यांच्यासमोर ही बाब मांडली त्यावेळी त्यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व कागदपत्रे तपासणीसाठी त्यांच्या समक्ष बोलावले असता संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस आला. त्याअनुषंगाने फौजदारीस पात्र ठरू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग राठोड यांनी ती तथाकथित पदभरती रद्द करीत असल्याचे स्वतः हमीपत्र दिल्याने संचालक पुणे यांनी गंभीर स्वरूपाची प्रशासकीय अनियमितता झाल्याचे निष्कर्ष नोंदवून ५० हजार रुपयांचा दंड संस्थेला ठोठावला आहे.
भविष्यात नव्याने नोकरभरतीच्या आशा आता धूसर : ॲड. श्रीकृष्ण राठोड
मा. संचालक, पुणे यांनी जो पदभरतीचा आदेश पारीत केला आहे तो स्वयंस्पष्ट आणि बोलका आदेश आहे. ज्यामध्ये शासनमान्यता असलेल्या त्याच रद्द ठरविलेल्या आठ जागेवर नव्याने पुन्हा नोकरभरती करावयाची असल्यास संस्थेला अग्नीपरिक्षाच द्यावी लागणार आहे. त्याचे कारण असे की, सन २०२३-२४ च्या विद्यार्थी संख्येनुसार राज्यातील सर्व आश्रमशाळांची संचमान्यता पार पडल्यानंतर अतिरिक्त कर्मचारी यांची संख्या ठरेल त्यांनतर त्यांचे समायोजन झाल्यानंतर अनुकंपा करीता असलेले पद रिक्त ठेवून अद्ययावत संचमान्यतेनुसार पदाची जाहिरात द्यावी लागेल. अद्यापही मध्यामिक आश्रमशाळेची बिंदू नामावली प्रमाणित झालेली नाही, हे सर्व दिव्य पार पाडता- पाडता इतर ठिकाणी अतिरिक्त ठरलेले कर्मचारीच या आश्रमशाळेवर समायोजन झाल्यास नविन नोकरभरती करण्याचे आणि जवळच्या नातेवाईकांचे पुनर्वसन करण्याचे शेवटपर्यंत दिवास्वप्नच ठरणार आहे.
संस्था सदस्यांच्या नातेवाइकांचा नोकरभरतीत समावेश अध्यक्ष पांडुरंग राठोड यांच्या सुनेला महिला वसतिगृह अधिक्षीका तर कोषाध्यक्ष गोवर्धन जाधव आणि सदस्य बलदेव जाधव यांच्या पुतण्याला स्वयंपाकी म्हणुन बेकायदेशीररित्या आणि पदाचा दुरुपयोग करून नियुक्ती दिल्याने पुणे येथिल बहुजन कल्याण विभागाचे संचालक साहेबांनी नोकरभरती रद्द ठरवून आम्हाला न्याय दिला आहे असे ॲड. मनोहर राठोड यांनी सांगीतले आहे.