मानोराचे ग्रामीण रुग्णालय आहे की कोंडवाडा
कॉंग्रेस नेते देवानंद पवार यांचा जिल्हाधिका-यांसमोर संताप
दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क
कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेसने समस्या शोधदिंडी सुरु केली आहे. या शोधदिंडीमुळे परिसरातील विकासाचे पितळ उघडे पडले आहे. दरम्यान आज शोधदिंडीकार कॉंग्रेस नेते देवानंद पवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचेसमोर समस्यांचा पाढा वाचला. मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय आहे की कोंडवाडा? असा प्रश्न करुन त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्याठिकाणी भेट देण्याचे आवाहन केले.
कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी कारंजा-मानोरा विधानसभा क्षेत्रात दिनांक 9 ऑगष्ट पासून समस्या शोधदिंडी सुरु केली. या शोधदिंडीचा समारोप दिनांक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या शोधदिंडीला सुरु होताच सर्वसामान्य नागरीक तसेच शेतक-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात दिंडी जाताच नागरीक गोळा होतात आणि आपल्या समस्या देवानंद पवार यांचेसमोर कथन करतात. अनेक नेते नागरीकांच्या समस्या एकतात आणि त्याचे निराकरण मात्र करीत नाही. देवानंद पवार यांनी मात्र दिंडीचा समारोप होण्यापुर्वीच प्रशासनाला समस्यांबाबत जाब विचारण्याचा सपाटा सुरु केला आहे. आज त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांची मानोरा विश्रामगृह येथे भेट घेऊन मानोरा येथील ग्रामीन रुग्णालयातील दुरावस्था कथन केली. जनावरांच्या कोंडवाड्यापेक्षाही बेकार अवस्था या रुग्णालयाची झाल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला. मानोरा येथे पॉवर स्टेशन नसल्यामुळे होणा-या समस्या त्यांना सांगीतल्या. सरकार एक रुपयात पिकविमा देत असले तरी त्याचा लाभ मात्र शेतक-यांना दिला जात नाही. ज्या शेतक-यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या त्यांनाच विमा दिला मात्र ज्यांनी तक्रारी केल्या नाही त्यांना विमा मंजुर करण्यात आला नसल्याचे सांगीतले. यासंदर्भात ऑनलाईन तक्रारी करणे गरजेचे असल्याचा मुद्दा जिल्हाधिका-यांनी समोर केला. यादरम्यान शेतकरी एवढे शिक्षीत असते तर त्यांनी शेती केलीच नसती असे सांगुन देवानंद पवार यांनी शेतक-यांची बाजु उचलून धरली. याबाबत सरकारला ऑफलाईन तक्रारी सुध्दा घेण्याबाबत सुचविण्याची विनंती देवानंद पवार यांनी केली.
कारंजा मानोरा समस्यांचे माहेरघर
कारंजा तसेच मानोरा समस्यांचे माहेरघर बनले आहे. देवांनद पवार यांच्या दिंडीने अनेक समस्या उघडकीस येत आहे. प्रत्येक गावात नागरीक आपल्या समस्या सांगुन न्यायाची अपेक्षा व्यक्त करीत आहे. सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, कामगार प्रचंड संकटात आहे. सरकारी यंत्रना कुणाचेच एकायला तयार नाही. अशा परीस्थितीत देवानंद पवार यांनी थेट सरकारी यंत्रनेला जाब विचारणे सुरु केल्यामुळे नागरीकांच्या अपेक्षाही वाढल्या आहे.