मानोरा ग्रामीण रुग्णालयाचे होणार कायापालट
ना.फडणवीस यांनी लक्ष घातल्याने ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन
मानोरा — (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या वाढत्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन जुन्या मागणीची दखल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून येथे ५० खाटाच्या अद्यावत उपजिल्हा रुग्णालयास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा कडून शासन निर्णय क्रमांक स्थापना २०२२ पत्र क्र.२१२ आरोग्य -३
नुसार मानोरा शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्याच्या शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावाला शासन निर्णयानुसार मूर्त रूप देण्यात आले असून तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय असलेल्या मानोरा शहरात आता ५० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात येणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामासाठी शासकीय धोरणानुसार जागा अधिग्रहीत करण्यात येणार असून उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम व उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक पद निर्मितीसाठी स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे आठ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
चौकट–
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टिकोनामुळे वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी व तीर्थक्षेत्र कोंडोली येथील तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, वन पर्यटन व आता नव्याने मानोरा ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटाचे श्रेणी वर्धन तथा कोंडोली येथील पर्यटन विकास योजनेअंतर्गत अतिरिक्त निधीचा प्रस्ताव मार्गी लागले असल्याचे समोर येत आहे.