भाजप संघटन मंत्र्यांची महाराज यांनी घेतली भेट
विविध विषयांवर बैठकीत चर्चा
मानोरा– तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाशी जुळलेले भक्तराज बाबूसिंग महाराज यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व विविध विषयांसंदर्भात पक्षाच्या ज्येष्ठांशी सविस्तर चर्चा केली.
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे केंद्र व महाराष्ट्र राज्यात सरकार असून संघ व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र, गरजू आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी आवश्यक ते प्रयत्न करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्ष विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर यांनी पोहरादेवी येथील भक्तराज महाराज यांना बैठकीदरम्यान सांगितले.
पंतप्रधान घरकुल योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सोबतच केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजना मानोरा व कारंजा तालुक्यातील तथा वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना काटेकोरपणे मिळणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिक तीर्थ दर्शन योजना या व इतर लोक कल्याणकारी योजना पारदर्शकपणे मिळण्यासाठी भारतीय जनता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज कोटेकर यांनी बैठकीदरम्यान विशद केल्याचे भक्तराज महाराजांनी माहिती दिली.
मानोरा- कारंजा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून विविध संभाव्य इच्छुक उमेदवारांसोबत भक्तराज महाराज सुद्धा या विधानसभा मतदार संघात पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत बूथ स्तरापासून तर तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याचे व निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती भक्तराज महाराजांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.