हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना भारतरत्न किताब देण्यात यावा
सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने प्रस्तावाला सहमती देण्याची आ.पाटोले यांची सभागृहात मागणी
मानोरा:– (दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)तालुक्यातील विठोली येथे प्राथमिक शिक्षण झालेले व राज्याचे सर्वाधिक काळ नेतृत्व केलेले माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांना त्यांच्या कार्याचा येतोचित सन्मान होण्यासाठी भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पाटोले यांनी कृषी दिनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.
पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार्याने योगदान दिलेले कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १११ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी करण्यात आली.
सध्या पावसाळी अधिवेशन राज्याच्या राजधानीत सुरू असून अधिवेशनादरम्यान एक जुलै ला कृषी दिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येण्याचा प्रस्ताव आ.नाना पटोले यांनी सभागृहामध्ये सादर करीत असल्याचा व सत्ताधारी आणि इतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सर्वांनूमते नाईक साहेबांच्या यथोचित सन्मानासाठी एकमताने या प्रस्तावाला समर्थन देण्याची आग्रही मागणी केली.