आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध कार्यक्रमांची सुनामी
शिबिर ,मेळाव्यांचे न भूतो न भविष्यती भडीमार
मानोरा:– ,(जगदीश राठोड) शहरामध्ये गत एक महिन्यापासून विविध राजकीय पक्ष,बहुउद्देशीय सामाजिक सस्था आणि मित्र मंडळाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंब, प्रतिभावंत विद्यार्थी त्यांचे पालक, यांच्यासाठी आणि रुग्णांसाठी तथा पर्यावरण संदर्भातील विविध कार्यक्रमांचा मारा सुरू असल्याने कुणाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे हा सवाल समस्त नागरिकांपुढे निर्माण झालेला दिसून येत आहे.
राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाची मुदत येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत असल्याने राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध पक्षातील अनेक डझन संभाव्य उमेदवार विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चाचणीसाठी आतापासूनच निवडणूक आखाड्यात उतरल्याचे त्यांच्या उत्तरोत्तर वाढत असलेल्या फेऱ्यांवरून निदर्शनास येत आहे.
दिवंगत राजेंद्र पाटणी हे भाजपाचे आमदार होते, भाजपा महायुतीतील घटक पक्ष असल्याने सगळ्यात प्रबळ दावा या पक्षातील उमेदवाराचा असणार आहे.
महायुतीतीलच दुसरे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून दिवंगत माजी आ. प्रकाश पाटील डहाके यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सईताई डहाके, जि.प.विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, या पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी आदी इच्छुक असून महायुतीचा तिसरा घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून कोण इच्छुक आहेत या संदर्भात सध्या तरी कोणाचेही नाम समोर आलेले निदर्शनास येत नाही.
महायुतीतील धोरणानुसार ज्या पक्षाचा जेथे आमदार आहे त्या पक्षालाच त्या मतदार संघात उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याने कारंजा-मानोरा मतदारसंघात भाजपाकडून ऐनवेळी पक्षश्रेष्ठी कुणाला कौल देते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.
महाविकास आघाडी तील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) पक्षाकडून स्थानिक आणि अनेक बाहेरचेही उमेदवार आपापले घोडे उमेदवारीसाठी सध्या पुढे दामटत असताना दिसत आहेत.उपरोक्त तीनही पक्षा मधून कुठल्या पक्षाला व स्थानिक की बाहेरच्या उमेदवाराला तिकीट मिळते यावर बरेच काही गणित अवलंबून आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील मानोरा तालुक्यातील आणि काही कारंजा तालुक्यातील स्थानिक संभाव्य उमेदवारांनी बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादल्यास आम्ही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार नाही अशी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी कडून इच्छुक असलेल्या बाहेरच्या संभाव्य उमेदवारांना गोचीला सामोरे जावे लागत आहे.
वंचित बहुजन विकास आघाडी हा पक्ष विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढतो की इतर पक्षासोबत युती करून हे सुद्धा लोकसभेनंतर यावेळीही महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हेमेंद्र ठाकरे ही सुद्धा निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत.
पक्षाचे हात डोक्यावर नाही मात्र विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात प्रवेश करायचे आहे असे असंख्य चेहरे मागील काही वर्षांपासून तालुक्यामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक व मतदारांना सामोरे जात आहेत.
युवा पिढींना विविध नामांकित वक्त्यांची प्रवचने, मार्गदर्शन पर कार्यक्रमांचे आयोजन, युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन, रुग्णांसाठी आरोग्य शिबिरे, शेतकरी,कष्टकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील नागरिकांचा कैवार, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हे व इतरही असंख्य कार्यक्रमांची भरमार तालुक्यात दिवसागणिक वाढत असल्याने कधी नव्हे ते शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी व त्यांचे पालक या अवकाळी ने विचारात पडलेले दिसून येत आहेत.
#
लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी होण्याची चढाओढ सध्या सुरू असून तालुक्यातील विद्यमान व प्रलंबित समस्यांना शासन दरबारी कोण मांडून त्यांचा निवारण करेल यासंदर्भात स्थानिक की बाहेरचा हे पर्याय नागरिक व मतदारांना एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीला उभे राहणार असल्याने उपलब्ध झालेला असल्याचे बोलले जात आहे.
फोटो :– (प्रतिकात्मक) हात जोडलेल्या पुढार्याचे