महावितरण अमरावती परिमंडळातील ४९ तांत्रिक कर्मचारी गुणवंत पुरस्काराने सन्मानित
- महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा
यवतमाळ,दि.३ मे २०२४; महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४१ तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्याचा बहुमान या महिन्यात सेवानिवृत्त होणारे अमरावती मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील शिंदे यांना देण्यात आला. मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ ज्ञानेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर परिमंडलातील ४९ कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र येथे कामगारांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी होते.तर अधिक्षक अभियंते सुनिल शिंदे,दिपक देवहाते, कार्यकारी अभियंते भारतभूषण औघड, आनंद काटकर, अनिरुद्ध आलेगावकर, राजेश माहुलकर,
उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे,उपविधी अधिकारी प्रशांत लहाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले की, महावितरणचे तांत्रिक कर्मचारी चुकीला माफी नसलेल्या क्षेत्रात २४ तास ऑन ड्यूटी काम करतात.त्यामुळे ते सर्व कौतुकास पात्र आहेत.
वीज ही आजच्या युगाची मुलभूत गरज बनल्याने महावितरणची सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. विद्युत कायदा २००३ मधील ग्राहककेंद्री प्रावधानांचा विचार करता आणि वितरण क्षेत्रात येऊ घातलेली स्पर्धा लक्षात घेता कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्याशिवाय यापुढे गत्यंतर नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्यानुसार स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्यासाठी मुख्यालयी राहणे, ग्राहकांच्या तक्रारींना तत्पर प्रतिसाद देणे, त्यांच्याशी योग्य समन्वय आणि सुसंवाद साधणे आणि ग्राहक सेवेचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी आगामि काळात प्रामुख्याने आरडीएसएस योजनेअंतर्गत यंत्रणा सक्षमीकरण आणि विस्तारीकरणाची कामे होणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकांना स्मार्ट मिटर लावण्यात येणार असल्याने ग्राहकांना अचूक वीज बिलासोबत त्यांचा प्रतिदिन वापर कळणार आहे.त्यामुळे ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. तथापि त्यासाठी ग्राहकांची थकबाकी शून्य असणे आवश्यक आहे.
तसेच वाढत्या थकबाकीमुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती बिघडत चाललेली आहे. हे लक्षात घेऊन थकबाकी वसुलीसाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सुर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत ग्राहकांना छतावर सौर पॅनेल बसविण्यासाठी ७८ हजार रूपयापर्यंत अनुदान मिळणार आहे.याशिवाय या उपक्रमामुळे वीज ग्राहकाला आपले वीजबिल शुन्यापर्यंत कमी करणे शक्य होणार आहे. यासारख्या उपयुक्त योजनांची माहिती ग्राहकांना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी प्रास्ताविक करत पुरस्काराचे स्वरूप,
पुरस्कारासाठी कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रीया याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाला एका सुत्रात बांधण्याचे काम सहाय्यक विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता भारतभूषण औघड यांनी मानले.