बेजबाबदार कंत्राटदारामुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात
रस्त्यावर विखुरलेले गिट्टीचे ढिगारे देत आहेत अपघाताला आमंत्रण
मानोरा :-तालुक्यातील ग्राम बोरव्हा येथे जाण्यासाठी वापरात असणारे कार्ली बोरव्हा रस्त्यादरम्यान कंत्राटदार कंपनीने रस्ता बांधकामासाठी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने खडी मागील अनेक महिण्यापासून ठेवलेली असून ही खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त विखरलेली असल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या दुचाकी,तीनचाकी व इतर मोठ्या वाहनांना अपघाताला व अडचणीला सामोरे जावे लागत असल्याची आपबीती व रोष ग्रामस्थांच्या वतीने सरपंच राजेश राठोड यांनी व्यक्त केला आहे.
कार्ली ते बोरव्हा फाटा (जिल्हा सीमा) रस्ता चिद्दरवार कंत्राटदार कंपनीने बांधण्यासाठी घेतलेला आहे.
चार महिन्यापूर्वी मोठ्या साईजची गिट्टी रस्त्यावर टाकून ठेवलेली असून ही गिठ्ठी आता वाहनांमुळे पसरली असल्याने या रस्त्यावरून येजा करताना मोठी अडचण ग्रामस्थांना व्हायला लागली आहे. एवढेच नव्हे तर अस्ताव्यस्त विखुरलेल्या गिट्टीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे टायर पंचर व्हायच्या घटना उत्तरोत्तर वाढत असल्याने या रस्त्यावर एसटी चालवण्यासाठी संबंधित विभाग नकार देत आहे. रस्त्यावरील धोकादायक गिट्टीमुळे वाहने रस्त्याने यायला धजावत नसल्याने बोरव्हा वाशियांच्या समस्येत भर पडली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच राठोड यांनी माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना अडचणीत आणणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी सरपंचाने केली असून मग्रूर कंत्राटदार कंपनीने येत्या दोन ते तीन दिवसात कार्ली ते बोरव्हा फाटा रस्त्याचे काम सुरू न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनीला दिला आहे.