दिग्रस नगरपालिका विरोधातील “आमरण उपोषण” अखेर आचारसंहितेमुळे मागे !
न्यायालयीन लढाई लढण्याचा संकल्प
दिग्रस :-
दिग्रस नगरपालिके मार्फत आकारण्यात आलेल्या जुलमी करवाढ विरोधात मागील काही दिवसापासून “आम्ही दिग्रसकर” या संघटनेने सुरू केलेले “आमरण उपोषण” आज आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे मागे घेण्यात आले . तहसीलदार प्रवीण धानोरकर , ठाणेदार सेवानंद वानखडे व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी यावेळी योग्य मध्यस्थी केली असून सदर प्रकरण न्यायालयात दाखल करून दाद मागण्यात येईल , अशी घोषणा यावेळी करण्यात आली .
याबाबत सविस्तर असे की नगरपरिषदेने भरमसाठ करवाढ करत त्यावर चक्रवाढ व्याजसुद्धा लावल्याचा आरोप करत “आम्ही दिग्रसकर” या सामाजिक संघटनेने पूर्वी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला . परंतु कोणतीच दखल न घेतल्याने अखेर “दिग्रस बंद”ची हाक देण्यात आली व मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला होता .
परंतु न्याय मिळत नसल्याचे पाहून “आम्ही दिग्रसकर” संघटनेने 13 मार्चपासून शहीद स्मारक येथे “आमरण उपोषण” सुरू केले होते . ज्येष्ठ शिवसैनिक पुनम पटेल , माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे ,भाजपा नेते मनोज राठोड , माजी नगरसेवक केतन रत्नपारखी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भारत पाटील यांनी पुढाकार घेत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती .
आजपासून देशात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तहसीलदार प्रवीण धानोरकर , ठाणेदार सेवानंद वानखडे व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी पुढाकार घेऊन या उपोषणकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला . त्यांच्या विनंतीला मान देऊन अखेर दुपारी उपोषणकर्त्यांनी आपले “आमरण उपोषण” मागे घेतले . कारवाढीचे सदर प्रकरण न्यायालयात दाखल करून दाद मागण्यात येईल , अशी घोषणा यावेळी करण्यात आली .
“आम्ही दिग्रसकर” संघटनेचे पदाधिकारी , विविध राजकिय , सामाजिक संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते व सामान्य नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते .