दिग्रस येथील “उच्च शिक्षणातील जागतिक दृष्टिकोन ” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला लाभले उत्स्फूर्त प्रतिसाद
देश-विदेशातील संशोधक, तज्ञ मार्गदर्शकांची हजेरी
तब्बल ५०० शोधनिबंध प्रकाशित
दिग्रस :-
दिग्रस येथे “उच्च शिक्षणातील जागतिक दृष्टिकोन: समस्या, आव्हाने व उपाय” या विषयावर आंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखेय परिषद शनिवारी थाटात संपन्न झाली . दिग्रस येथील बापुरावजी बुटले कला , नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय , दारव्हा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालय तसेच बोरी अरब येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे संयुक्तरित्या आयोजित या परिषदेत देश-विदेशातील संशोधकांचे तब्बल ५०० शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले .
दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग यांनी उद्घाटनीय समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले . अकोला येथील सीताबाई कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दारव्हा येथील व्ही. पी. एमचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर व दारव्हा येथील एन. एस. पी. एमचे संचालक राहुल ठाकरे उपस्थित होते . बीजभाषक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेपाळ येथील डॉ. आर. एस. प्रधान , छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सईद अझरुद्दीन यांची उपस्थिती होती . दिग्रसचे प्राचार्य व मुख्य आयोजक म्हणून डॉ. ए. आर. लाडोळे , दारव्हाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. राऊत , बोरी अरबचे प्राचार्य डॉ. डी. के. खुपसे, प्राचार्य , तसेच परिषदेचे सचिव डॉ. मनोज भगत देखील मंचावर उपस्थित होते .
उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे सहसमन्वयक डॉ. संजय देवस्थळे यांनी केले तर आभार प्रदर्शन परिषदेचे समन्वयक डॉ. प्रवीण चांडक यांनी केले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . बीजभाषक सत्राचे अध्यक्षस्थान यवतमाळ येथील आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांनी भूषविले , बीजभाषक म्हणून डॉ. आर. एस. प्रधान, नेपाळ यांनी “उच्च शिक्षणातील समस्या आव्हाने व उपाय” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले .
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान मनोरा जिल्हा वाशीमच्या श्रीमती एम. एस. पी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे यांनी भूषविले . तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेपाळ येथील डॉ. डी. आर. शर्मा यांनी अशा परिषदेचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले . परिषदेच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान मंगरूलपीर जि वाशीम येथील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव पवार यांनी भूषविले . तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सईद अझरुद्दीन , छत्रपती संभाजी नगर यांनी उच्च शिक्षण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले .
शोध निबंध व पोस्टर सादरीकरण सत्रामध्ये यवतमाळ येथ डॉ. अजय लाड , उमरखेड येथील डॉ. धनराज तायडे , व यवतमाळ येथील डॉ. गणेश खंडेराव आदी परीक्षक म्हणून उपस्थित होते . सदर सत्रामध्ये २१ संशोधकांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले . उत्तम सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन संशोधकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
बोरी अरब येथील आर्टस् व कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. खुपसे समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी होते . सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. नितीन बारी, जळगाव खान्देश यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व प्राध्यापकांच्या कार्यभारासंबंधी सखोल मार्गदर्शन केले . सदर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देश विदेशातील जवळपास ८०० संशोधकांनी नोंदणी केली होती व जवळपास ५०० शोधनिबंधकांचे प्रकाशन करण्यात आले . सदर परिषदेचे सहयोजक मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा आणि कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब हे होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी तीनही आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .
फोटो :—