लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रसिद्ध जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचा सत्कार
ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला गौरव
रत्नागिरी:- विदर्भातील यवतमाळ ह्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून सेवा दिलेले व आता कोकणातील रत्नागिरीला जिल्हाधिकारी म्हणून सेवेत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याला राज्यातील नामांकित वृत्तपत्र समूहाद्वारे राबविल्या गेलेल्या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल इतर अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात गौरविण्यात आले. रत्नागिरीला जिल्हाधिकारी म्हणून नेमणुकीला असणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी एम देवेंदरसिंह लोकाभिमुख प्रशासनासाठी राज्यात प्रसिद्ध असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत.
काही अधिकारी आपल्या कार्यशैलीमुळे व प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे अल्पावधीतच जनसामान्यांच्या हृदयात रुजून जातात व कायम स्मरणात राहतात. गत तीन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात मातीशी नातं ठेवून कर्तव्याचा निर्वाह करणारा अत्यंत कार्यक्षम, लोकाभिमुख व शिस्तप्रिय जिल्हाधिकारी म्हणून सिंह यांनी ओळख निर्माण केली होती.यवतमाळ जिल्ह्याची महाराष्ट्रात मागास जिल्हा, शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त असलेला जिल्हा म्हणून देशभरात कुप्रसिद्ध असल्याने हा जिल्हा कायम वादाच्या भोवऱ्यात राहून चर्चेत राहतो. जिल्ह्यातील आव्हानांना संधी समजून अल्पावधीत बारोमास कष्टाच्या वस्तीत राबराब राबणाऱ्या शेतकरी, श्रमजीवी, सर्वसामान्य उपेक्षित घटकांसोबत समन्वय व संवादाने एकवाक्यता निर्माण करून व जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आस्थेने विचारपूस करून त्याच्या समस्येचे निराकरण करणारे अधिकारी म्हणून ओळखल्या गेले होते.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या संवेदनशील अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून मिशन उभारी सारखे कार्यक्रम हाती घेऊन पायलट प्रोजेक्ट राबवले.जिल्ह्यात ” पांदण ” रस्त्याचा विषय ॲक्शन मोडवर घेऊन शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण केले होते.
बदलीनंतर बीड जिल्ह्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी सर्वोत्तम अधिकारी म्हणून देश पातळीवर गौरविलेले आहे. तद्वतच नुकताच वृत्तपत्राच्या क्षेत्रातील लोकप्रिय वृत्तपत्र ” लोकसत्ता ” यांच्या निर्देशांकात सर्वोत्तम अधिकारी म्हणून त्यांना दि.१५.०२.०२४ ला मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते त्यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून एम देवेंदर सिंह रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले याचा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विशेष आनंद झालेला आहे.
मिळालेल्या पुरस्कारासाठी जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी चळवळीत काम करणारे मनीष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.
बॉक्स:–
विदर्भ,मराठवाडा असो अथवा कोकण जिल्हाधिकारी सिंग हे युवकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते आयएएस झालेले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील आत्मघात केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींना त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते नेहमी मार्गदर्शन करतात. शेती व शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आस्था व जिव्हाळा जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.