संत सेवालाल महाराजांच्या क्रांतिकारी विचारांना सगळीकडे तिलांजली ?
मुखात सेवालाल,डोक्यात मनू – नामा बंजारा
मानोरा:– तालुक्यात समाधीस्थ झालेले व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन समाजाला मनुवादाच्या मगरमिट्ठीतून मुक्त करण्यासाठी अनमोल संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराज यांची जयंती भारतातील तांड्या पाड्यात धूम धडाक्यात साजरी होत असतांना पाहून आनंद होत आहे. परंतु ही जयंती साजरी करतांना संत सेवालाल महाराज यांचे विचार जनमानसात रुजावे यासाठी जसे प्रयत्न व्हायला पाहिजे तसे न होता डिजेच्या तालावर चित्रपटाच्या गीतावर, संत सेवालाल महाराज यांच्या विचाराशी कवडीचाही संबंध न ठेवता, मद्यधुंद होऊन नाचणारी तरुणाई पाहून मुंहमे सेवालाल अन डोक्यात मनू? अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र पाहून मनाला वेदना होतात. त्यामुळे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करतांना इतरांचे अंधानुकरण न करता भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव व उदयोन्मुख साहित्यिक नामा बंजारा यांनी केले. मानोरा तालुक्यातील चिखली या गावी आयोजित संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संत सेवालाल महाराजांचे तत्वज्ञान सगळ्या महामानवाच्या तत्वज्ञानाचीच पुढची पायरी आहे. परंतु सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करताना बहुतांश समाजबांधव संत सेवालाल महाराजांच्याच विचाराकडे दुर्लक्ष करतात व कळत न कळत संत सेवालाल महाराजांची जयंती मनूलालच्या विचाराने साजरी करतात. संत सेवालाल महाराज “केनी भजो मत, पुजो मत म्हणतात”आम्ही त्याच्या अगदी उलट तिथे अनेक देवतांची पूजा करतो, आरती म्हणतो एवढेच काय वक्रतुंड महाकाय हेही सुरू असते. हे मनुचे विचार संत सेवालाल महाराजांच्या विचाराच्या अगदी विरोधी आहे, पण जयंती साजरी करण्याच्या जल्लोषात ते आमच्या लक्षातच येत नाही. संत सेवालाल महाराज जाणजो छाणजो पचच मानजो म्हणतात, आम्ही अगदी उलट अंधश्रध्देच्या आहारी जातो, संत सेवालाल महाराज तम तमार जिवणेम वजाळो ला सकोचो म्हणतात आम्ही जयंतीलाच धार्मिक कर्मकांडाचे स्वरूप देतो, संत सेवालाल व्यसनाधीनता, दारू, शाकाहारी जीवन, चोरी याला विरोध करण्याची शिकवण देतात मात्र आम्ही अगदी उलट वागतो, त्यामुळे संत सेवालाल महाराजांची प्रतिमा ठेऊन, त्यांचे नाव घेऊन आम्ही कामे मात्र मनुवादाचीच करतो ही फार मोठी शोकांतिका आहे. ही केवळ काही उदाहरणे आहेत पण संत सेवालाल बापू यांच्या प्रत्येक शिकवणीच्या खोलात जाऊन विचार केला आणि आपले वागणे तपासले तर आपण संत सेवालाल महाराजांचे अनुयायी आहोत की मनुचे हे आपोआपच आपल्या लक्षात येईल त्यामुळे संत सेवालाल महाराज यांची जयंती तांड्या तांड्यात मोठ्या उत्सवाने जयंती करतांना त्यांच्या आचार विचाराची पेरणी करून त्यांच्या विचाराच्या पीकाची रास घराघरात कशी लागेल, वर्तमान काळातील भीषण समस्येची उकल कशी होईल,संत सेवालाल महाराज यांना अभिप्रेत असलेला निसर्ग पूजक तांडा या जयंतीच्या कार्यक्रमातून कसा निर्माण होईल याची काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन नामा बंजारा यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार जगदीश राठोड हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.