मानोरा:–नववर्षाचा सध्या दुसराच महिना सुरू असून या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यातील काही गावांना पाण्याची नियोजन व्यवस्थित न करण्यात आल्यास नजीकच्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची समस्या दारासमोर आ वासून उभी असताना तालुका आपत्ती निवारण प्राधिकरण यामध्ये हस्तक्षेप न करता तक्रारकर्त्या स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांना सोयीचे उत्तरे देऊन माघारी पाठवीत असल्याचा रोष संबंधित गावाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. पाळोदी ग्रामपंचायत च्या वतीने तहसीलदार मानोरा यांना गत महिन्याच्या १९ तारखेला निवेदन देऊन पाळधी आणि धोनी या दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये स्थानिक १० ते १२ नागरिकांनी बेकायदेशीर रित्या विद्युत पंप बसवून पाण्याचा उपसा सुरू केल्याने या तलावातील पाणी पुढील काही आठवड्यात संपण्याची भीती असल्याने तलावावरील अनधिकृत विद्युत पंप त्वरित बंद करून दोन्ही गावाच्या नागरिकांच्या जीवनासाठी आवश्यक असणारे पाणी राखून ठेवण्याची विनंती करणारे निवेदन दिले होते. पाळोदी गावालगतच्या साठवण तलावा तील पाणी पाळोदी आणि ढ़ोनी गावातील नागरीक आणि पशुधनासाठी वापरण्याच्या कामी येत असल्याने व पाण्याची पातळी खाजगी विद्युत पंप धारकाकडून बेकायदेशीर रित्या उपसल्या जात असल्याने खालावली असल्याची तक्रार ग्रा.पं. सरपंचांनी तालुका प्रशासनाकडे करून हस्तक्षेपाची विनंती केली होती. पाळोदी व ढोणी या गावांची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता साठवण तलावावरील विद्युत पंप तातडीने हटवून उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित करण्याची मागणी करण्यासाठी निवेदन घेऊन काही ग्रामस्थ तहसीलदारांकडे गेले असता आपली समस्या जलसंपदा विभागाकडे घेऊन जा असे उत्तर येथे नेमणुकीला असणाऱ्या जबाबदार तहसीलदारांकडून मिळाल्याची आपबिती स्थानिक सरपंचांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केल्याने प्रशासकीय अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असतात की त्यांच्या अडचणीत वृद्धी करण्यासाठी असा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे.
बॉक्स:– पाळोदी आणि ढोणी येथील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळांपासून वाचविण्यासाठी तालुका आपदा प्राधिकरणाने ग्रा.पं. आणि नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा सारासार विचार करून योग्य ती पावले उचलावीत.