दुष्काळग्रस्त शेतक-यांचा सोटा मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकणार
काँग्रेसचा पुढाकार , महाविकास आघाडीचा सहभाग
मानोरा प्रतिनिधी
सुरवातीला ओला व नंतरच्या कोरड्या दुष्काळामुळे संपूर्ण शेतं पीके वाया गेली आणि उरल्या सुरल्या पिकांची अवकाळी पावसामुळे नासाडी झाली. या वर्षीच्या खरीप हंगामात काहीच पिकले नसल्याने प्रशासनानेही ४८ पैसे आणेवारी काढली. मात्र, असे असतांनाही मानोरा तालुक्यासह वाशीम जिल्ह्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही. सरकारच्या या अन्यायाविरुध्द संतप्त शेतकऱ्यांचा सोटा मोर्चा बुधवार दि. ३१ जानेवारीला मानोरा तहसिल कार्यालयावर धडकणार आहे.
काँगेसच्या पुढाकारात निघत असलेल्या शेतकऱ्यांच्या या सोटा मोर्चात मानोरा तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष पूर्ण शक्तीने सहभागी होणार आहे. दि. २६ जानेवारी रोजी मानोरा येथील शिवसेना भवनात संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार अनंतकुमार पाटील हे होते. तर शिवसेना (उ.बा.ठा) चे विधानसभा सहसंपर्क प्रमुख अनिल राठोड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा वाशीम जिल्ह्याचे प्रभारी देवानंद पवार, वाशीम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बलदेव महाराज, वाशिम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, मानोरा कृ.उ.बा.समितीचे सभापती संजय रोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस श्याम जाधव यांच्यासह मोठया संख्येत महाआघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समिती कार्यालयापासून तहसिल कार्यालयावर सोटा मोर्चा नेण्यात येणार आहे. संतप्त झालेले शेतकरी आपल्या हातात सोटे घेऊनच या मोर्चात सहभागी होणार असून झालेल्या अन्यायाच्या संदर्भात जाब विचारतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनंतकुमार पाटील व शिवसेनाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात निघत असलेल्या या मोर्चाचे नेत्रृत्व काँगेस पक्षाचे जिल्हा प्रभारी देवानंद पवार करतील. आज मानोरा तालुक्यात शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाची व अवकाळीची मदत नाही अन् पीकविमाही मिळाला नाही. दिवसा विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने रात्रीला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यायला जावे लागत आहे. जंगली डुकरं व रोह्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. अशा अनेक समस्या असतांना सरकार मात्र शेतक-यांच्या विषयावर गंभीरतेने विचार करायला तयार नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा हा सोटा मोर्चा निघत आहे. या सोटा मोर्चात शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, महिला तसेच नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन मानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल तरोडकर, शिवसेना(उबाठा) तालुका प्रमुख रवि पवार, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काशीराम राठोड यांनी केले आहे.
प्रति,
संपादक / जिल्हा प्रतिनिधी/ तालुका प्रतिनिधी/ प्रतिनिधी
महोदय,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.