सुरक्षित मतदारसंघाच्या शोधार्थीं पाखरांच्या घिरट्यांमध्ये वाढ
स्थानिक व भूमिपुत्र उमेदवारांमध्ये अस्वस्थता
मानोरा:– ह्या कारंजा मानोरा मतदार संघाचा भाग असणाऱ्या शहर व तालुक्यामध्ये विविध पक्ष, संघटनांचे मोठे पदाधिकारी व काही मोठ्या राजकीय नेत्यांचे सगे सोयरे कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बस्तान बसविण्यासाठी प्रारंभी दोन्ही शहरे व आता दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध मित्र मंडळाच्या माध्यमातून दौरे काढायला लागलेले असल्याने मानोरा शहर आणि तालुक्यातील जनमत ढवळून निघायला आणि दोन्ही तालुक्यातून स्थानिक व भूमिपुत्र उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरायला सुरुवात झालेली आहे.
कारंजा ह्या पूर्वाश्रमीच्या विधानसभा मतदारसंघाने अनंतराव देशमुख, बाबासाहेब धाबेकर आणि गुलाबराव गावंडे यांना मंत्री पदापर्यंत पोहोचविलेले आहे आणि आत्ताच्या कारंजा मानोरा ह्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तिसऱ्यांदा विधिमंडळात प्रतिनिधित्व करीत आहेत. मंत्री पदापर्यंत पोहोचलेले तेव्हाचे लोकप्रतिनिधी व आत्ताचे विद्यमान आमदार हे मानोरा अथवा कारंजा ह्या तालुक्याचे स्थानिक नागरिक नसल्याने हा मतदार संघ कुणीही सर करू शकतो असी बहुदा धारना दोन्ही तालुक्यात घिरट्या घालणाऱ्या पर जिल्ह्यातील असंख्य उमेदवारांवरून समोर येत आहे.
कारंजा-मानोरा मतदारसंघात एक वेळा निवडून आलो तर भविष्यात दोन ते तीन टर्म आरामशीर निघून जात असल्याने
यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील आमदार होऊ इच्छिणाऱ्या व विविध पक्षांमध्ये कार्यरत असणारे आणि काही सामाजिक राजकीय संघटनाच्या नावाने राजकारण करू पाहणाऱ्या इच्छुकांची भाऊगर्दी विधानसभा निवडणुकांना अनेक महिन्यांची अवधी असताना दिवसागणित वाढताना निदर्शनास येत आहे.
राज्यातील सर्वाधिक मागास असणाऱ्या तालुक्यांमध्ये मानोरा तालुक्याचा क्रमांक अग्रक्रमात येत असताना येथे बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या, शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाणी मिळावे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी तालुका पालथा घालणाऱ्या या निवडणूक इच्छुकांनी शासन आणि प्रशासनाला कधी जाब विचारल्याचे कुणाच्याही ऐकिवात नसताना केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच हा उपदव्याप बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांकडून होत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या नजरेतून सुटेल एवढेही ह्या तालुक्यातील नागरिक भोळे नसल्याचे बोलले जात आहे.
#
शिक्षण,सिंचन,आरोग्य,रोगार निर्मिती, वन,जल, कृषी,पायाभूत सुविधा विकास या संदर्भात तालुक्याचा अनुशेष वर्षानुवर्षे सातत्याने वाढत असताना ह्या दीर्घकाळ ठसठसणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येऊ शकणाऱ्या सक्षम आणि स्थानिक व भूमिपुत्र उमेदवारा संदर्भात मतदार संघातील नागरिक यावेळी काय भूमिका घेतात की जुनाच कित्ता गिरवितात हे काही महिन्यातच आता स्पष्ट होणार आहे.