वाघाच्या वावराने शेतकरी भितीच्या छायेत
वन प्रशासनाने हिंस्त्र पशूचा बंदोबस्त करण्याची मागणी
मानोरा:- तालुक्यातील आसोला कारपा शेतशिवरादरम्यान मागील अनेक महिन्यांपासून वाघाचे वावर असल्याने ह्या भागात शेती कसत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये व गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण असून तालुका वन प्रशासनाने या हिंस्त्र प्राण्याचे प्राण्याचे बंदोबस्त करण्याची मागणी आसोल्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दिवसा वीज राहत नसल्याने रात्री गहू,हरभरा,तूर या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावेच लागते. मागील तीन महिन्यांपासून या भागात वाघ डरकाळी फोडत असल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर शेती कशी कसावी हा प्रश्न निर्माण होत आहे.
आसोला गावाला लागून असलेल्या वनहद्दी जवळील शेत शिवारामध्ये रब्बी हंगामाची कामे करीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा आणि शेताची रखवाली करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रात्री वाघाच्या डरकाळीमुळे भीतीचे कापरे भरत असल्याची माहिती या गावातील शेतकरी अनिल राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
आसोला शेतशिवाराला लागून मोठ्या प्रमाणात वन प्रशासनाचे जंगल असून शेजारी कारपा,हातोली, आमदरी, शेंदुर्जना या गावांच्या आजूबाजूलाही वन जमीन आहे. उपरोक्त गावातील जंगलांमध्ये वावरणारे हिंस्त्र श्वापदाने असल्यातील अनेक गुरांचा आतापर्यंत बळी घेतलेला आहे व शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या भागामध्ये दिवसा शेती काम व रात्री रखवाली साठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
#
तालुका वन प्रशासनाने कुठल्याही नागरिकाचा बळी जाण्यापूर्वी या हिस्त्र शापदाला सुरक्षित जेरबंद करण्याची मागणी आसोला येथील शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.
फोटो :– असोला शेत शिवारात उमटलेले वाघाच्या पायाचे ठसे