मुंबईवरून लोकप्रतिनिधी हाकत आहेत मानोराच्या शेळ्या
कृषी,महसूल,पंचायत सारख्या महत्त्वाच्या विभागातील वर्षानुवर्षे प्रभारी राजाने नागरिक वाऱ्यावर
मानोरा:– शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवून प्रशासनाचा गाडा हाकल्या जात असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब शासन आणि प्रशासनाने लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी तातडीने उपरोक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्याचे मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी व शासनाकडे करण्यात आले आहे.
अमूल्य मते देऊन ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना तालुक्यातील नागरिकांच्या अडचणींचे काही देणे-घेणे नसल्याचे हे द्योतक आहे. साहेब सातत्याने मुंबईला असतात, त्यांच्याशी दूरध्वनीवर सुद्धा संपर्क होणे सर्वसामान्यांसाठी अशक्य बाब झालेली आहे.कधीतरी त्यांचे दर्शन महिन्यातून एखाद्या वेळी तालुक्यात होत असल्याने हे प्रकार मागील अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या प्रशासकीय विभागात घडत आहेत.
जिल्हाधिकारी वाशिम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका पदाधिकारी मानोरा यांचेकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मानोरा शहरातील दहा हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरवासीयांच्या समस्यांशी निगडित बाबींचे निराकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्याधिकाऱ्यांचे पद सातत्याने रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यातील शेकडो वाडी,वस्ती, तांड्यातील नागरिकांचे विविध विकास कामासाठी सबंध येत असलेले संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे पद सुद्धा काही काळ वगळता प्रभारी अधिकारी यांच्या नेमणुकीने भागविले जात असल्याने घरकुले,स्वच्छते संबंधीचे प्रश्न आणि ग्रामीण पायाभूत विकास कामांचा ह्या अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे खोळंबा होत असल्याने उपरोक्त प्रशासकीय पदी सुद्धा कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहसील कार्यालय मानोरा येथे सुनील चव्हाण नावाचे राज्य लोकसेवा आयोगाकडून नेमणुकीला असलेले तहसीलदार तब्बल तीन वर्षे सेवेला होते त्यानंतर आलेले सगळे अधिकारी काही महिन्यांसाठीच येथे सेवेला असल्यामुळे उर्वरित कालावधी प्रभारी तहसीलदार यांच्या खांद्यावर अविकसित व मोठ्या तालुक्याची जबाबदारी येत असल्याने महसुली कामांसंबंधी अडचणींना तालुक्यातील नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत असल्यामुळे न.पं.ला मुख्याधिकारी, पं.स.ला संवर्ग विकास अधिकारी, तालुका कृषी विभागाला कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारा करण्यात आली आहे.
#
प्रकाश पर्वाचा दिवाळी सण दारावर येऊन ठेपलेला असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांची दिवाळी गोड होण्यासाठी उपरोक्त अधिकाऱ्यांची नेमणूक तातडीने न करण्यात आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.